28 January 2021

News Flash

औरंगाबाद की संभाजीनगर?

पालिका निवडणुकीच्या तोंडावर जुन्या वादाला पुन्हा फोडणी

(संग्रहित छायाचित्र)

महापालिका निवडणुकीपूर्वी औरंगाबाद की संभाजीनगर असा प्रश्न निर्माण व्हावा अशी रचना शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षांकडून नेहमी घडवून आणली जाते. त्याला आता डिजिटल प्लेक्स फलकाचे कारण मिळाले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत ‘लव्ह औरंगाबाद’, ‘लव्ह खडकी’ असे फलक बसविण्यात आले. जाता जाता या प्रकाशमान फ्लेक्समध्ये स्वप्रतिमा काढून घ्यावी आणि ‘शहरी’ वातावरण निर्माण व्हावे, असा त्याचा उद्देश; पण औरंगाबाद आले की संभाजीनगर आलेच पाहिजे असे प्रयत्न होतात.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे अध्यक्ष असणाऱ्या संस्थेला ‘सुपर संभाजीनगर’ असे फ्लेस उभे करण्याची परवानगी देण्यात आली आणि शहराच्या नामकरणाच्या राजकारणाचे डिजिटलायझेशन करण्यात आले. त्यातच एका मद्यपीने ‘लव्ह औरंगाबाद’ एक फलक फोडला आणि आता ‘स्मार्ट’ शहरात नव्या फलकामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी फलक फोडणाऱ्या एकाला अटक केली आहे; पण शहर विकासाच्या स्मार्ट योजना म्हणजे नक्की काय रे भाऊ, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याऐवजी तातडीने विमानतळाचे नाव बदलता येऊ शकते असे लक्षात आल्यानंतर औरंगाबाद विमानतळ असे नामकरण आता ‘छत्रपती संभाजीराजे विमानतळ’ असे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे; पण रस्त्यांना, गावांची नावे बदलण्याच्या भाजपच्या जुन्या प्रयोगांना शिवसेनेची अजूनही साथ असल्याचे दिसत आहे.

भाजप आणि संघ परिवारातील व्यक्ती मुघलकालीन नावे म्हणण्याऐवजी जाणीवपूर्वक जुनी नावे वापरतात. उस्मानाबादला धाराशीव म्हटले जाते, तर खुलताबादला शिवसैनिक रत्नपूर म्हणतात. १९९२ पूर्वीपासून नाव बदलण्याचे हे प्रयोग पद्धतशीरपणे अमलात आणले जातात. त्याचा परिणाम राजकीय व्हावा असे प्रयत्न केले जातात. त्याला आता शहरी परिमाण मिळाले आहेत. शहरी होणे म्हणजे झगमगाटाभोवती जमणे अशी नवी फॅशन होईल आणि त्यातून शहराविषयीचे प्रेम निर्माण होईल अशा कल्पानांवर स्मार्ट सिटीतून ‘लव्ह औरंगाबाद’च्या फ्लेक्सचे प्रयोग करण्यात आले. असे गावाच्या नावाचे विभाजन व्हावेच असे वाटणाऱ्यांनी कोणी विरोध न केल्याने ‘लव्ह औरंगाबाद’ आणि ‘सुपर संभाजीनगर’ असे प्रयोग केले गेले.

शहराची जुनी नावे पिढीपर्यंत जावीत, असा महापालिकेचा उद्देश होता, असे सांगत करण्यात आलेल्या या प्रयोगाला शहरातील छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळील ‘लव्ह औरंगाबाद’चा फलक फोडण्यात आला. या प्रश्नी कायदा सुव्यवस्था बिघडेल असे काही करू नये, आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे; पण नाव बदलण्याचे प्रयोग लक्षात घेता पुन्हा ‘लव्ह औरंगाबाद’ की ‘सुपर संभाजीनगर’ असे प्रश्न निर्माण केले जात आहेत. शहराचे नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी जुनी आहे. भाजप-सेनेची सत्ता असताना याकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवर्वूक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी भाजपकडून आता ‘संभाजीनगर’चे काय, असे प्रश्न उपस्थित केले जातात.

शहराचे नाव बदलण्याचे थोतांड आहे. सत्ता असताना नावबदल करण्याचे आदेश  काढायचा नाही आणि नावे बदलण्याचे फलक लावयाचे. हे शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरून आलेल्या पर्यटकाला एवढी नावे बघून नक्की काय वाटेल सांगता येत नाही; पण नावांचा खेळ जुना आहे. आता हे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबडय़ावरचे आहे. त्यामुळे आदेश काढण्याची ते हिंमत दाखविणार आहेत.

– सुहास दाशरथे, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

शहरात आता १५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. पर्यटनाच्या अंगाने शहर पुढे जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाळसाहेब ठाकरे यांचे स्मृती वनाचे काम आता सुरू  होत आहे. शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन विकासाची संकल्पना शिवसेनेकडून मांडली जात आहे. शहरातील दहा ठिकाणी  ‘सुपर संभाजीनगर’ असे फलक लिहिण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी दोन ठिकाणी असे फलक लावण्याची परवानगी मिळाली आहे. त्यापैकी एका ठिकाणी तसे फलक लावले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असावे, ही शिवसेनेची जुनी भूमिका आहे. ती उघडपणे आम्ही मांडतोच. त्यामुळे इतर कोणाला ‘लव्ह औरंगाबाद’ म्हणायचे असेल तर आमचा त्याला विरोध नाही.

– अंबादास दानवे, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना

‘सुपर संभाजीनगर’चा फलक पाहिल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा ठरविल्या वाटते. पिण्याचे पाण्याचे, कचरा,  बेरोजगारी, उद्याने, खुले भूखंड असे सारे प्रश्न सारे संपलेत वाटते. सेना-भाजपचे हे नेहमीचे आहे.

– इम्तियाज जलील, एमआयएम खासदार, औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2020 12:20 am

Web Title: aurangabad municipal corporation elections the old controversy erupted again abn 97
Next Stories
1 राज्यात अतिवृष्टीच्या मदतीबाबतचा केंद्रीय अहवाल दोन आठवडय़ांत
2 ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ट्रॅक्टरने मशागतीचा खर्च निम्म्यावर
3 गावकारभाऱ्यांना प्रलोभन
Just Now!
X