महापौर, उपमहापौर यांनाही ‘विस्थापित’ होण्याची वेळ

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सोमवारी वॉर्डाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये महापौर, उपमहापौर, शिवसेना सभागृहनेत्यांचेच वॉर्ड आरक्षित झाले आहेत. या दिग्गज नेत्यांवरच विस्थापित होऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. इटखेडा भागातील माझाच वॉर्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

उपमहापौर, युवा सेनेचे नेते राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारासाठी राखीव झाला आहे. तर सभागृहनेते विकास जैन यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांनाही अन्य वॉर्डातून निवडणूक लढवावी लागणार आहे. राजू वैद्य यांचा विद्यानगर हा वॉर्डही नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव हृषीकेश खैरे निवडून आलेला समर्थनगर आणि सचिन खैरे यांचाही पहाडसिंगपुरा हा वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांचा बन्सीलालनगर हा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे मकरंद कुलकर्णी (गणेशनगर) आदींनाही नवा वॉर्ड शोधावा लागणार आहे. गणेशनगर हा वॉर्ड आता नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

भाजपचे नेते माजी महापौर भगवान (बापू) घडामोडे, माजी उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, राजू तनवाणी, जयश्री कुलकर्णी, गजानन बारवाल यांनाही नवे ठिकाण शोधून तेथून निवडून येण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. भगवान घडामोडे यांचा वॉर्ड सर्वसाधारण महिलेसाठी सुटला आहे. प्रमोद राठोड यांचा विश्रांतीनगर सर्वसाधारण महिलेसाठी, तर माजी महापौर गजानन बारवाल यांचा पदमपुरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला आहे. विजय औताडे यांचा मयूर पार्क, हरसिद्धीनगर हा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्या सरिता अरुण बोर्डे यांचा क्रांतीनगर वॉर्ड आता खुला झाला आहे. एमआयएममधून हकालपट्टी झालेला वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन रशीद याच्या वॉर्डातही बदल झालेला आहे. मतीन याचा जयभीमनगर, आसेफिया कॉलनी हा वॉर्ड नामाप्रमधील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. मतीन याच्याविरुद्ध मध्यंतरी बलात्काराचा गुन्हा नोंद असून तो बरेच दिवस कारागृहातही होता.

एकूण ११५ वॉर्डमधील ५५ वॉर्ड हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (०२) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. हर्सूल, भगतसिंगनगर, म्हसोबा नगर, वानखेडेनगर, होनाजीनगर ,जयसिंगपुरा, नारेगाव पश्चिम, सावित्रीनगर, चिकलठाणा नारेगाव पूर्व, पवननगर, इंदिरानगर बायजीपुरा पूर्व, अल्तमश कॉलनी, आविष्कार, गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर, विष्णुनगर, अंबिकानगर, रामनगर, विठ्ठलनगर, विश्रांतीनगर, गजानन नगर, गणेश कॉलनी, भडकल गेट, बुढीलेन, शहाबाजार, मकसूद कॉलनी, शताब्दीनगर, रोशन गेट, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, कबीरनगर, वेदांतनगर, बन्सीलाल नगर, इटखेडा, देवानगरी, प्रतापनगर हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

फटका वगैरे काही नाही

आरक्षण सोडत ही प्रक्रिया निवडणूक विभागाच्या अधिकारात पार पाडली जाते. जे काही वॉर्ड आरक्षित झाले त्याचा आम्ही आदर करतो. त्याला कोणी आव्हान देण्याचा विचार करत असेल तर ते सयुक्तिक नाही. शिवसेनेच्या दिग्गजांना अन्य ठिकाणाहून निवडणूक लढवावी लागली तरी विकासाच्या मुद्यावर आमच्या विद्यमान नगरसेवकांनाही कोठेही अडचण येणार नाही. आम्हाला धक्का, असे म्हणता येणार नाही.

-नंदकुमार घोडेले, महापौर.