श्वानांच्या गणनेसाठी गुजरात, गोव्याच्या कंपनीशी संपर्क

औरंगाबाद : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गतवर्षी अक्षराचा मृत्यू झाला. तर, रविवार, १२ जानेवारी रोहित हा चिमुकला जखमी झाला आणि शहरात उदंड झालेल्या श्वानांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पच अडचणीत येईल, असा साक्षात्कार औरंगाबाद महानगरपालिकेला झाला. आता मनपाने मोकाट श्वानांची गणना करण्याचा आणि श्वानमालकांना प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. श्वान गणनेसाठी गुजरात, गोव्यातील कंपनीशी संपर्क करण्यात येत आहे.

गुजरातमधील ह्य़ुमन सोसायटी इंटरनॅशनल व गोव्यातील मिशन रेबिज, या दोन संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. प्रतिश्वान ३० रुपये या कंपन्यांना अदा करण्यात येतील. याशिवाय शहरातील औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन- आपला (एपीएलए) या संस्थेमार्फत शाळास्तरावर कुत्र्यांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुत्र्यांपासून कसा बचाव करायचा, यासह चावल्यानंतरच्या उपाययोजना, याविषयीही माहिती जनजागृतीद्वारे देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा बेरील संचिज यांच्याशी बोलणी सुरू आहेत. या संस्थेलाही काही रक्कम द्यावी लागणार आहे. यासाठी आता महानगरपालिकेला साधारण १५ ते २० लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

कुत्र्यांच्या मालकीचेही प्रमाणपत्र विचारण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडे आतापर्यंत केवळ ३२ जणांनीच कुत्र्यांच्या मालकीचे प्रमाणपत्र घेतलेले आहे. यापूर्वी २ हजार २०० श्वान मालकांनी प्रमाणपत्रे घेतली होती. मात्र नंतर त्यांनी त्याचे नूतनीकरण करून घेतले नाही. असे प्रमाणपत्र घेण्यासाठी रेबिज प्रतिबंधक लस टोचल्याचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्र व ५०० रुपये शुल्क आकारले जाते, असे महापौर घोडेले यांनी सांगितले. तर श्वान मालकीच्या संदर्भाने केनल क्लब ऑफ इंडिया येथे नोंदणी करावी लागते, असे सर्व पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात साधारण ५० ते ५५ हजार मोकाट कुत्रे असल्याची माहिती सहा महिन्यांपूर्वी महापौरांनीच एका श्वानांचे लसीकरण करणाऱ्या खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितली होती.

शहरातील मोकाट कुत्र्यांना सध्या संसर्गजन्य खरुज, असा आजार जडला असून बहुतांश कुत्री ही डेमोडक्टिक मेंज (खाजवण्याचा आजार) या विकाराने पीडित आहेत. याशिवाय पायका (अभक्ष्य भक्षण करणे) या आजाराचीही लागण झालेली आहे. यामध्ये कुत्रे दिसेल ते खातात. प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकलेले अन्न जसेच्या तसे खाण्यात येते. बऱ्याचवेळा अन्नावर शौच करतात. असे विष्ठा पडलेले अन्न खाल्याने पोटात जंत होतात. औरंगाबादेत कुत्र्यांमध्ये खरुज आजाराची साथ असल्याची माहिती डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले.

शहरात साधारण ४५ हजार भटके श्वान आहेत. अडीच हजार श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. पिसाळलेला कुत्रा आणि अन्य प्रकारचा कुत्रा चावल्यानंतर तत्काळ काय करावे, याविषयी आम्ही शाळांमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. याशिवाय श्वान दंश झालेल्या रुग्णांना कोणत्याहीवेळी तत्काळ प्रतिबंधक लस मिळावी, यासाठीही प्रयत्न केले जातात.

– बेरिल संचिज, अध्यक्षा, श्वानप्रेमी संघटना