औरंगाबाद महानगरपालिकेच्यावतीने शहरात जागोजागी स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानचे पोस्टर व होर्डिंग लावण्यात आले आहेत. महापौर, आयुक्त यांचे फोटो वापरून लावलेल्या या बॅनरमध्ये शहर स्वच्छ होत आहे, असे सांगण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे संकलन आणि विलगीकरण योग्य पद्धतीने होत असल्याचे यात मांडले आहे. दुसरीकडे शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली निघत नाही म्हणून नारेगाव येथे नागरिकांचे आंदोलन सुरू असून आज मुंडन करून त्यांनी महानगरपालिकेचा निषेध केला.

शहराचा कचरा शहरालगत असलेल्या नारेगाव परिसरात टाकला जातो. या कचरडेपोमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे सांगत परिसरातील सुमारे पंधरा गावांतील नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन उभारले आहे. त्यामुळे महापालिकेची कचराकोंडी झाली आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी पालिकेने पर्यायी जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र जागा मिळाली नाही. नारेगाव परिसरातील नागरिकांनी या कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने केल असून तब्बल आठवडा उजाडूनही कचराकोंडीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पालकमंत्री दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही कचराकोंडी त्यांनाही फोडता आली नाही. तसेच अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्रही कायम असले, तरी यावर अद्याप तोडगा निघत नाही.

महानगरपालिकेच्यावतीने शहरात स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानचे पोस्टर लावलेत. त्यातील मुकुंदवाड़ी व रामनगर ठिकाणा येथील पोस्टर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे. शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले असताना अशी बॅनरबाजी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एवढ्या घाणीतही महापालिकेला शहर स्वच्छ दिसतयं, त्यातही काही बॅनर चोरीला गेल्याने शहरातील स्वच्छता चोरीला गेल्याची टीका केली जात आहे.

दरम्यान, कचरा प्रशनांसाठी नारेगाव येथील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े आणि मनपा शिष्टमंडळ आज भेट घेणार आहेत. कचरा प्रश्नावर आज तोड़गा निघणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.