राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून प्रचंड ओरड सुरू आहे. इतकंच काय तर रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य, ठाकरे सरकार-भाजपा यांच्या वादाच्या ठिणग्याही उडल्या… असं असताना तब्बल रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ४८ वाईल्स गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयातून रेमडेसिवीर ४८ इंजेक्शनचा एक बॉक्स गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. इंजेक्शन गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेमडेसिवीर हाताळणी आणि वितरण व्यवस्थेत असणाऱ्या पाच जणांना महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी नोटीस दिली असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन महापालिका आयुक्तांनी दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी केले होते. त्यामुळे शहरात लाट तीव्र असतानाही या इंजेक्शनची फारशी ओरड नव्हती. काही कुप्या महापालिकेनं ग्रामीण भागासाठी आणि खासगी रुग्णालयासही दिल्या. मात्र, आता इंजेक्शनचा बॉक्सच गायब झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सर्वत्र सुरू असताना मेट्रॉन रुग्णालयातून इंजेक्शन गायब झाल्याचे वैद्याकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे आता भांडार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच रुग्णालयातील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान रेमडेसिवीरचा साठा किती? तो दिवसाला किती मिळतो? आणि कोणाला वितरित होतो यात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी आता केली जात आहे.

केंद्राकडून रेमडेसिवीरच्या पुरवठ्यात वाढ

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे निर्माण झाला होता. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधलं होतं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार वाईल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. केंद्राच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार वाईल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार वाईल्स करण्यात आलेला आहे.