सध्याच्या घडीला व्हॉटसअॅपच्या अतिरेकी वापरामुळे समाजातील अनेक संसार उद्धवस्त होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून समाजातील चुकीच्या पद्धतीला देखील आळा घालता येवू शकतो, याचा प्रत्यय नुकताच औरंगाबादेतील एका घटनेतून आला. व्हॉटसअॅपवरील संदेशामुळे औरंगाबादेत बालवयात बोहल्यावर चढविण्यात येणाऱ्या मुलीचा बालविवाह रोखणे शक्य झाले.  त्यामुळे कमी शब्दांत व्यक्त होणाऱ्या आणि गालावर हास्य फुलविणाऱ्या संदेशाशिवाय या माध्यमातून समाजिक भान जपता येणे शक्य असल्याचे समोर आले आहे.
एका पंधरा वर्षीय मुलीचा विवाह होत आहे. आणि त्या विवाहाला तिचा विरोध असून घरचे बळजबरी विवाह करत असल्याचा एक संदेश गुरुवारी रात्रीपासून औरंगाबादेतील स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर फिरत होता. या संदेशामध्ये विवाहस्थळ आणि कार्यालयाचा नंबर देखील देण्यात आला होता. पोलिसांनी या संदेशाची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पोहोचून हा बालविवाह थांबवला. व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या संदेशामध्ये मुलीचे वय १५ वर्षे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर मुलीचा या लग्नाला विरोध असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला होता. मात्र, संदेशातील ही माहिती पूर्णपणे खरी नसल्याचेही समोर आले.

मुलीचं वय १५ वर्षे नसून १७ वर्ष ९ महिने असं आहे. शिवाय मुलीवर कोणताही दबाव नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मुलीला आई नसल्याने आणि वडील नशेच्या आहारी गेल्यामुळे मुलीचे नातेवाईक तिचा विवाह लावत होते. पोलिसांनी लग्नापूर्वी समारंभाच्या ठिकाणी पोहोचून ३ महिन्यानंतर विवाह लावण्याची दोन्ही परिवाराला सांगितले. पोलिसांनी दिलेला कायदेशीर पर्याय वर-वधू पक्षातील मंडळींनी मान्य केला. त्यांनी तीन महिन्यांनी मुली लग्न लावून देण्याचे पोलिसांना तयारी दर्शवली आहे.