औरंगाबाद हे शहर राज्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. पण या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस आयुक्तपदावर अजूनही पूर्णवेळ अधिकारी देण्यात आलेला नाही. औरंगाबादमधील तणावानंतर आता तरी गृहखात्याला जाग येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मार्चमध्ये औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला होता. मिटमिटा येथे ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या रोखल्या होत्या. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. पोलीसच ग्रामस्थांच्या घरावर दगडफेक करत असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण विधानसभेतही गाजले आणि शेवटी तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. तेव्हापासून औरंगाबादला पोलीस आयुक्त नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस महानिरीक्षक मिलिंद भांबरे यांच्याकडे औरंगाबाद पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोन गटात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण इतक्या संवेदनशील शहरात आता तरी पूर्ण वेळ आयुक्त दिला जाईल का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे.