औरंगाबादमध्ये सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावलाय. कारण शहरातील बीड बायपासवरील वाहनांची वेग मर्यादा आता ‘लेझर स्पीड गन’ च्या निगराणीत असणार आहे. बीड बायपास मार्ग सततच्या अपघातामुळे ‘मृत्यूचा बायपास’ होत असल्यामुळे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने हा पर्याय शोधला आहे. वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गांधेली फाटा ते लिंकरोड दरम्यान, स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाणार आहे.

बीड बायपासवर वाहनांना ४० वेग मर्यादा घालून दिलेली आहे. मात्र, ही मर्यादा बरेच वाहन चालक ओलांडताना  दिसते. परिणामी या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.  वाहनांच्या वाढत्या वेग मर्यादेमुळे  महामार्गावरील होणाऱ्या अपघातावर  नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महामार्गावरील नव्याने वापरण्यात येणाऱ्या लेझर गनमुळे तीन किलोमीटर अंतरावरून टार्गेट कॅप्चर केलं जाणार आहे. या यंत्राची ५०० मीटर पासून कॅमेरा रेंज फिक्स करता येते. तसेच  १५० मीटरच्या टप्प्यात वाहन आल्यानंतर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जाणार आहे. हा  कलर फोटो तारखेसह मिळणार आहे. एवढेच नाही तर  ३२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांचाही फोटो ह्या कॅमेऱ्यात निघणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करणे पोलिसांना सहज शक्य होईल.  वेग मर्यादा पाळली नाही, तर  वाहन चालकावर सक्त कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. त्याबाबतची सूचना देणारे फलकही बीड बायपास रोडवर लावण्यात आले आहेत.