औरंगाबाद :   पोलिसांच्या मदतीने ठरवून केलेला एकतर्फी हल्ला असे औरंगाबादच्या दंगलीचे वर्णन करावे लागेल. या हिंसाचारामध्ये जे नेते सहभागी होते, त्यांच्यावर तातडीने कारवाई करायला हवी. त्यात विद्यमान शिवसेना खासदारांचाही समावेश असावा, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली आहे. बुधवारी त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलीस गोळीबारात मृत्यू झालेल्या हारिस कादरी याच्या घरी जाऊन पडताळणी करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचे सांगत दलवाई यांनी पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली.

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या यशश्री बाखरिया यांचे वडील लच्छू बाखरिया यांचा या दंगलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतानाही या आरोपीस अटक करण्यात आली नाही, असे सांगत या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुका येताच दंगली का होतात, असा सवाल उपस्थित करीत दलवाई यांनी भाजप-सेनेच्या वादातून ही दंगल घडवून आणल्याचे दिसून येत आहे. या दंगलीमध्ये एमआयएमचाही सहभाग असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज असल्याचे दलवाई म्हणाले. पोलिसांच्या मदतीनेच नेहमी दंगली घडत असतात. या वेळीही असेच घडल्याचे सांगत हुसेन दलवाई यांनी काही भागात दहशत पसरवून त्या आधारे राजकीय गणिते बांधण्यासाठी दंगल घडविली असल्याचा आरोप केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी आपण जातपात मानत नाही असे सांगतात. आता त्यांच्याच पक्षाचा खासदार हे सारे घडवून आणतो आहे. त्यामुळे त्यांना अटक केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.