औरंगाबादमध्ये गोवंश वाहतुकीवरुन दोन गटात वाद झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे गुरुवारी पहाटे शहरातील काही भागात तणाव निर्माण झाला होता. सध्या शहरात शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

औरंगाबादमधील शिल्लेखाना येथे बुधवारी रात्री गोवंश वाहतुकीवरुन दोन गटात वाद झाला. समाजकंटकांनी परिसरातील वाहनांवर दगडफेक केल्याने परिस्थिती चिघळली. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद, दोन उपायुक्त, चार ते पाच पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी असा फौजफाटाच घटनास्थळी पोहोचला. पहाटेपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी विवेक बापटे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सलीम कुरेशी व अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.