औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात असलेल्या पट्टेदार करिना वाघिणीची प्रकृती बिघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीनं अन्नपाणी सोडले असून, प्रशासनानं मंगळवारी करिनाची करोना चाचणी केली आहे. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला नसला, तरी तिच्यावर उपचार सुरू आहेत.

देशभरातच करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना करोना होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आधीच जारी केलेले आहेत. दरम्यान, औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात आठ पिवळे व तीन पांढरे वाघ आहेत. यातील करिना वाघीण गंभीर आजारी पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीनं खाणंपिणं बंद केलं आहे.

प्रकृती बिघडल्यानं करिनाला प्राणी संग्रहालयातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून अन्नपाणी बंद असल्यानं करिना वाघिणीला सलाईन लावण्यात आलं आहे. वाघिणीच्या किडनीला संसर्ग झाल्यानं नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंगळवारी दुपारी औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी करिना वाघिणीची पाहणी केली. त्यानंतर घाटी रुग्णालयातील पथकाला पाचारण करण्यात आले. वाघिणीची करोना टेस्ट करण्यात आली असून, रिपोर्टची प्राणी संग्रहालय प्रशासनाला प्रतीक्षा आहे.