औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात काळे व पत्की यांच्यात लढत

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये पारंपरिक भाजप किंवा संघ परिवारांशी संबंधित संस्थांचे वर्चस्व असायचे, पण गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसने या निवडणुकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीने दोनदा विजय मिळवला आहे. या वेळीही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे हे तयारीनिशी रिंगणात उतरले असून, त्यांना भाजपचे सतीश पत्की यांनी आव्हान दिले आहे.

औरंगाबाद विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नेहमीप्रमाणे सामसूम आहे. विधान परिषदेची ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली आहे. तसेच शिवसेनेचेही आहे. या मतदारसंघात शिवसेनेने एकदाही उमेदवार उभा केला नाही. या निवडणुकीसाठी ५८ हजार ४१० मतदारांची अंतिम यादी तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे आणि भाजपकडून सतीश पत्की निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. १६ जानेवारी रोजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे तर दुसऱ्या दिवशी भाजपचे सतीश पत्की मिरवणुकीने अर्ज दाखल करतील.

सर्वसाधारणपणे एका मतदारसंघात सव्वादोन ते अडीच लाख मतदार विधानसभेत असतात. त्याच्या केवळ एक चतुर्थाश मतदारांची ही विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात विक्रम काळे यांनी या पूर्वी दोनदा विजय मिळविला आहे. पदवीधर मतदारसंघात तगडा जनसंपर्क अशी ओळख निर्माण करणारे (कै.) वसंतराव काळे यांचे ते चिरंजीव होत. मात्र, पदवीधर मतदारसंघात श्रीकांत जोशी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर वसंतराव काळे यांनी शिक्षक मतदारसंघाशी निवडणूक लढविली. त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूती व जनसपंर्काच्या आधारे विक्रम काळे यांनी दोन वेळा विजय मिळवला. ते गेल्या साडेनऊ वर्षांपासून या संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या वेळी त्यांना सतीश पत्की यांचे आव्हान आहे.   पत्की यांची उमेदवारी भाजपने पूर्वीच जाहीर केली. मतदार नोंदणीपासून ते मतदारांशी संपर्क करता यावा म्हणून भाजपकडूनही तयारी करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार भाजपचे असल्याने त्याचा लाभ भाजपच्या उमेदवाराला मिळेल, असा दावा केला जातो.  राष्ट्रवादीने या मतदारसंघावर मिळवलेली पकड लक्षात घेता काँग्रेसने या मतदारसंघाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. ना आघाडीची अधिकृत घोषणा होते ना काँग्रेसकडून उमेदवार दिला जातो. अशीच अवस्था शिवसेनेची आहे. या वेळी बीड जिल्हय़ातील मतदारसंख्येतही मोठी वाढ आहे. याचा फायदा होईल, असा दावा भाजपकडून केला जातो. सतीश पत्की हे बीडचे रहिवाशी आहेत. अंतिम मतदारयादी करण्यापूर्वी बीड जिल्हय़ातील काही मतदारांच्या वैधतेवर सुनावणीच झाली नव्हती. त्यामुळे या मतदारसंघात पूर्वी ५५ हजार ७७ मतदार असतील, असे सांगितले जात होते. मात्र, आक्षेपानंतर त्यात वाढ झाली आहे. मतदारयादीमध्ये पूर्वी सतीश पत्की यांचेच नाव नव्हते. आता नव्या प्रक्रियेनंतर ते समाविष्ट झाले आहे.

चुरशीची लढत

आघाडी सरकारच्या काळात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विक्रम काळे यांनी पुरेसे प्रयत्न केले नसल्याचा आरोप पत्की यांनी केला आहे. या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आमदार काळे यांनी आंदोलने केल्याचा दावाही त्यांचे समर्थक करतात. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीमधून काँग्रेस व शिवसेनेने अंग काढून घेतले आहे. परिणामी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सरळ लढत होईल, असे मानले जाते.

डाव्यांच्या पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादीची सरशी

मराठवाडय़ातील शिक्षक मतदारसंघ हा तसा डाव्या चळवळीशी संबंधित. मराठवाडा शिक्षक संघातर्फे या मतदारसंघात प. म. पाटील, पी. जी. दस्तुरकर, राजभाऊ उदगीरकर यांनी विजय मिळविला होता. मात्र, महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या आणि शिक्षकांचे मजबूत संघटन राष्ट्रवादीने आपल्या बाजूला वळविले.