सुहास सरदेशमुख

जुलैमध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराच्या प्रमुख सहा मार्गावर चाचणी करण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत चाचणीसाठी नाकातून स्राव घेण्यासाठी डॉ. अंकिता जोशी दौलताबाद किल्ल्या जवळील केंद्रावर काम करायच्या. महिनाभरात त्यांना सुटी मिळणे शक्य नव्हते. त्यांनीही ती मागितली नाही. आता १२ तासांचा कालावधी ८ तासांपर्यंत खाली आणण्यात महापालिका प्रशासनाना यश आले आहे. एका बाजूला विषाणूचा पाठलाग करायचा आणि दुसरीकडे नागरिकांच्या चाचणीच्या विरोधालाही सामोरे जायचे अशा दुहेरी कात्रीत आता प्रशासन सापडू लागले आहे. शहरातील फुलेनगर, आंबेडकरनगर, जटवाडा भागातील जहाँगीर कॉलनी, सईदा कॉलनी या भागातील नागरिक महापालिकेचे पथक आले म्हटल्यावर घराला कुलूप घालून निघून जातात. सर्वसामान्यांची ही भूमिका अधिक घातक आहे. विरोध सुरू आहे, असे आम्ही लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविले असल्याचे जटवाडा भागातील डॉ. समीर खान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

करोना रुग्णांची संख्या वाढली की प्रशासनाच्या विरोधात मोठी ओरड झाली. परिणामी न्यायालयाने लक्ष घातले. याच काळात अँटिजेन चाचण्या घेण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. जुलैअखेपर्यंत  ८५ हजार ५४४ चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतरही सरासरी तीन हजार चाचण्यांचा वेग काम राखण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही भागातून महापालिकेच्या डॉक्टरांना आणि आशा व अंगणवाडी कार्यकर्तीना काही भागातून हुसकावून लावले जात आहे. डॉ. समीर खान म्हणाले, ‘सईदा कॉलनी, जहाँगीर कॉलनी या भागात अँटिजेन चाचण्यासाठी शिबिर लावले. पण कोणी तिकडे आले नाही. दुकानदारांना चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने त्यांच्यापैकी कोणी करोना रुग्ण आढळला तरी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती दिली जात नाही. पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, असेही रुग्ण सांगतात. घराला कुलूप घालून निघून जातात.’ एका बाजूला विषाणूचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक गतीने केली जात असताना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

शहरात येणाऱ्यांची वाट अडवून कोणी करोनाबाधित शहरात येणार नाही यासाठी सुरू असणाऱ्या मोहिमेला मात्र चांगले यश मिळत असल्याचे चित्र आहे. गेले महिनाभर महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या चमूने एकही सुटी घेतली नाही. गेल्या वर्षी दंत महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या डॉ. अंकिता जोशी म्हणाल्या, ‘जुलै महिन्यातील १२ तासांचे काम आता आठ तासांपर्यंत खाली आणले आहे. एक चमू वाढविण्यात आल्याने कामाचा ताण काहीसा कमी झाला आहे. शहरात येणाऱ्यांच्या चाचण्या केल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणावर चांगला परिणाम होईल.’

चाचण्या वाढवून विषाणूचा शोध घेताना नागरिकांनी सहकार्य केले नाही तर अडचणी वाढू शकतात, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. या अनुषंगाने बोलताना महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर म्हणाल्या,‘आम्ही सगळे दिवसरात्र काम करतो आहोत. पण लोकांनीही सहकार्य करायला हवे. अनेक भागातून चाचण्यांना विरोध होत असल्याचे लेखी अहवाल मिळत आहेत. मार्ग काढतो आहोत. पण विरोध केल्याने समस्या वाढू शकते.’

करोनाबाधितांचा आलेख वाढताच

औरंगाबाद करोनाबाधितांचा आलेख वाढताच असून शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेर्वयत ग्रामीण भाग वगळून २२६ करोना रुग्ण वाढले. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या  १६ हजारांकडे सरकू लागली आहे. जिल्ह्यातील ५१९ जणांचे मृत्यू झाले असून शुक्रवारी बारा जणांचा मृत्यू झाला. बजाजनगर, जयभवानी चौकातील २७ वर्षीय पुरुष, हडको टीव्ही सेंटर भागातील ६१ वर्षांची महिला व एन-११ भागातील ६५ वर्षीय पुरुष तसेच खासगी रुग्णालयात शहरातील टीव्ही सेंटर भागातील, गंगापूर येथील ७० वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच गंगापूर तालुक्यातील एक पुरुष, गारखेडा येथील ७१ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. एकाच भागातून अधिक रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.