21 September 2020

News Flash

औरंगाबादमध्ये गंभीर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यांपेक्षा अधिक

टोसिलिझुमॅब, रेमडेसवीर औषधांचा तुटवडा

(संग्रहित छायाचित्र)

टोसिलिझुमॅब, रेमडेसवीर औषधांचा तुटवडा

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : दाखल होणारे गंभीर करोना रुग्ण बरे होण्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रमाण जुलै अखेरीस ७३.६७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. बरे होण्याचे हे प्रमाण सुरुवातीच्या महिन्यात अगदी शून्यावर होते. इटलीसारख्या देशात मृत करोना व्यक्तीच्या उत्तरीय तपासणीनंतर औषधांच्या वापरात बदल होत गेले. पहिल्या टप्प्यातील भीतीचा टप्पाही हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. या काळात चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर मृत्युदर कमी होत आहे. औषधोपचाराच्या प्रयोगासह विषाणू रूप बदलत असल्यानेही डॉक्टरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच टोसिलिझुमॅब, रेमडेसवीर या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

करोना विषाणूच्या रुग्णांची बेरीज जेव्हा वाढू लागली, त्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात २३ गंभीर रुग्ण दाखल झाले. या महिन्यात दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकाही व्यक्तीचा आरोग्य यंत्रणेला आजाराच्या बाहेर काढता आला नाहीत. रुग्ण बरा होत नाही, असे चित्र एप्रिलमध्ये असल्याने आरोग्य यंत्रणाही हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या काळात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि अ‍ॅझीथ्रोमासिन या दोन औषधांसह टॅमी फ्यू सारखी औषधे वापरली जात होती. विषाणूविरोधी औषधे आणि प्रतिजैविकेही वापरली जात. पुढे इटलीमधील मृत करोना व्यक्तींच्या शरीरातील बदलानंतर औषध देण्याची कार्यपद्धती बदलण्यात आली. तसे उपचारातील बदलही झाले. या काळात आरोग्य यंत्रणेतील आजाराची भीतीही कमी होत गेली. परिणामी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जून महिन्यात ४१ टक्क्यांवर आले. घाटी रुणालय प्रशासनाकडून ‘लोकसत्ता’कडे देण्यात आलेल्या माहवार आकडेवारीनुसार औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये २३ रुग्ण दाखल होते. त्यातून एकही रुग्ण बरा झाला नाही. मेमध्ये हे प्रमाण वाढत गेले. गंभीर रुग्णांची संख्या २५५ वर गेली आणि त्यापैकी ९६ रुग्ण बरे झाले. जूनमध्ये दाखल रुग्णांची संख्या ५८१ पैकी २४० रुग्ण बरे झाले. तर जुलमध्ये ५६६ पैकी ४१७ रुग्ण बरे झाले. अलिकडेच अगदी ९० वर्षांच्या गंभीर रुग्णासही करोनामुक्तीनंतर घरी पाठविण्यात आले.

चाचण्यांवरचा १२ कोटींपेक्षा अधिक खर्च

शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात जुलैअखेरीपर्यंत ५८ हजार ३४१ चाचण्या घेण्यात आल्या. आरटी-पीसीआरच्या एका चाचणीसाठी २२०० रुपये तर अँटिजेन चाचणीसाठी ५५० रुपये खर्च होतात. चाचण्यांसाठी लागणारे किट राज्य सरकारकडून देण्यात आले असले, तरी त्यावरील खर्च १२.८३ कोटी रुपयांपर्यंत झाला. यातील साधारणत: ३५ हजार चाचण्या महापालिका क्षेत्रातील असतील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. हातमोजे, पीपीई किट यांची उपलब्धतता वाढत गेली. पण त्यावरही दोन कोटींपेक्षा अधिकची रक्कम खर्च झाली आहे. घाटी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

प्रतिमाह घाटी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण

एप्रिल                मे                   जून             जुलै

दाखल रुग्ण                   २३                   २५५               ५८१                 ५६६

बरे झालेले रुग्ण               ०                    ९६                 २४०             ४१७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 5:24 am

Web Title: aurangabad the cure rate for critically ill covid 19 patients is over 73 percent zws 70
Next Stories
1 औरंगाबादमधील लाजीरवाणी घटना, ९० वर्षांच्या करोनाबाधित आजीला जंगलात दिले टाकून
2 चाचण्यांमुळे यंत्रणेची दमछाक
3 मराठवाडा विकास मंडळासाठी लोकप्रतिनिधी एकवटले
Just Now!
X