सुहास सरदेशमुख

औरंगाबाद शहरातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार १०६ एवढी आहे. त्यात गंभीर आणि सौम्य लक्षणे असणारे आणि लक्षणे न दिसता बाधित असणारे यांचे प्रमाण ३०: ७० असे असायला हवे. मात्र ते औरंगाबाद शहरात ५०: ५० असे झालेले असल्याने रुग्णालयातील खाटांचा ताळमेळ नव्याने मांडला जात आहे. महापालिकेकडून करोना उपचार केंद्रात सौम्य आणि लक्षणे नसणारे रुग्ण भरती करून घेतले जातात. तरे काही लक्षणे नसणारी व सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खासगी रुग्णालय गाठत असल्याने खाटांची संख्या अपुरी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही बाधितांमधील लक्षणे नसणारे आणि असणाऱ्यांचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक होत असल्याचे मान्य केले. यामुळे खाटांचा ताळमेळ नव्याने करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरात गंभीर रुग्ण तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) मध्ये ६५८ खाटा आरक्षित आहेत. तसेच औषधी विभाग, बहुउपचार केंद्रात तसेच महात्मा गांधी मिशनच्या  रुग्णालयात १५८५ खाटा आहेत. यामध्ये ऑक्सीजन पुरवठा करता येतील अशा खाटांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसात दोन महिन्यात घाटी रुग्णालयातील मृत्यू संख्या १२५ एवढी झाली. तसेच येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारीही येत होत्या. यामुळे करोनाची सौम्य लक्षणे आढळली तरी अनेक जण खासगी रुग्णालयात दाखल होण्यास अग्रक्रम देत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील करोनाबाधितांसाठी आरक्षित खाटा शिल्लक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकदा खाटा शिल्लक नसल्याने करोनाबाधित रुग्ण दोन तीन तास शहरात फिरत राहतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना विचारले असता सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर कोविड उपचार केंद्रामध्येच उपचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तशा सूचनाही महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लक्षणे दिसल्यानंतर लगेच उपचारासाठी नागरिक येत नाहीत. प्रकृती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी येतात. परिणामी खाटांचे व्यवस्थापन बिघडते, असे सांगण्यात येत आहे. अजूनही घाटी रुग्णालयात खाटा शिल्लक आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सौम्य लक्षणे असणारी आणि लक्षणे नसणाऱ्या करोनाबाधित रुग्णांवर कोविड उपचार केंद्रामध्येच उपचार केले जातात. ५५ वर्षे वयोगटातील अन्य आजार असणाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीवर विशेष लक्ष दिले जात आहे. खाटांची उपलब्धता खासगी रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात लावावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. एका नियंत्रण कक्षातून रुग्ण आणि उपलब्ध खाटा याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे खाटा कमी पडतील, अशी स्थिती नाही. पण सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू असणाऱ्या जिल्हा रुग्णालयाची क्षमता २०० असेल तर तेथे रिक्त खाटा ठेवण्याची गरज नाही. त्यातील जे रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर असतील त्यांना पुन्हा कोविड उपचार केंद्रात आणले जात आहे. खाटांच्या ताळमेळाचा प्रश्न सोडविला जात आहे.’ लक्षणे असणारे आणि नसणारे बाधित याचे प्रमाण ५०:५० एवढे नाही. महापालिकेच्या कोविड उपचार केंद्रात उपचार सुरू असल्याने खाटांच्या व्यवस्थापनाचा ताळमेळ नव्याने केला जात आहे.

‘एमआयडीसी’चे रुग्णालय

औरंगाबाद शहरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने २१० खाटांचे रुग्णालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या रुग्णालयात कर्मचारी भरतीही सुरू आहे. येत्या आठ-दहा दिवसात ते रुग्णालय सुरू होऊ शकते. त्यामुळे खाटांची अडचण येणार नाही. या सर्व खाटांच्या व्यवस्थापनामध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात संस्थात्मक विलगीकरणातील संख्या साडेचार हजाराहून अधिक आहे.

ग्रामीण भागातही फैलाव

शहरातील विविध शासकीय रुग्णालयात पुरेसे व्हेटिंलेटर आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध इमारतींमध्ये ११४ व्हेंटिलेटर असून विविध कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतूनही रुग्णालयास ते दिले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयात काही वेळा अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर दररोज ९० ते १०० रुग्ण दाखल होत आहेत. अशा स्थितीत शहराभोवतीच्या गावात जर उद्रेक झाला तर परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे या गावांच्या भोवताली नव्याने कोविड उपचार केंद्र सुरू करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या गावांमध्ये साडेचार लाख लोकसंख्या आहे आणि गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहराच्या भोवतालच्या छोटय़ा गावातही विषाणूने पाय पसरले आहेत.