बिपीन देशपांडे

येथील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील २५ ते ३० वर्षांत दोन जोडय़ांपासून वाघांची संख्या ४० पर्यंत वाढत गेल्याने औरंगाबाद हे व्याघ्रजन्मदर वाढीसाठी चांगले ठिकाण असल्याची पुष्टी मिळत आहे. त्यासाठी येथील वातावरण पोषक असल्याचा दावा केला जातो.

येथे कडाक्याची थंडी नसते की रखरखता उन्हाळा.  हे लक्षात घेता यापुढे औरंगाबादेतच १४ वरून २५ पर्यंत वाघांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली.

औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात सुरुवातीला पंजाबमधील चतबीर प्राणिसंग्रहालयातून वाघांचे दोन नर व दोन माद्या आणण्यात आल्या होती. या जोडय़ांपासून सुरू झालेला व्याघ्रजन्मदर वाढत-वाढत गेला. आतापर्यंत ४० वाघांचा जन्म सिद्धार्थ उद्यानात झालेला आहे. यातील सोळा वाघ हे इतर ठिकाणच्या प्राणिसंग्रहालयास देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेशातील इंदोर, सतना, टाटा प्राणिसंग्रहालय, मुंबई, पुणे, बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयाचाही समावेश आहे.  वयोमानपरत्वे दहा वाघांचा मृत्यूही झालेला आहे.

व्याघ्रजन्मदर वाढीचे औरंगाबाद हे प्रमुख केंद्र ठरत आहे. इतर ठिकाणच्या प्राणिसंग्रहालयात पाच-पाच वर्षे वाघांची जोडी एकत्र ठेवूनही व्याघ्रजन्म होत नसल्याचीही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.

औरंगाबादेतील समृद्धी वाघिणीने २५ डिसेंबर रोजी सकाळी पाच बछडय़ांना जन्म दिलेला आहे. समृद्धी वाघीण तिसऱ्यांदा प्रसूत झालेली आहे. यापूर्वीच्या दोन प्रसूतीदरम्यान तिने सात बछडे दिलेले आहेत. नाताळच्या दिवशी जन्मलेल्या पाच बछडय़ांमुळे सद्याच्या स्थितीत सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या एकूण १४ झाली असून त्यात एक पांढरा वाघही आहे.

औरंगाबाद येथील  सिद्धार्थ उद्यानाचे विस्तारित स्वरुप पडेगाव येथील सफारी पार्कमधील जागेत करण्यात येणार आहे. या ठिकाणी येत्या काही वर्षांत २५ वाघ पाहायला मिळतील. जन्मदर वाढवण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत. सद्याच्या स्थितीत सिद्धार्थ उद्यानात नुकत्याच जन्मलेल्या पाच बछडय़ांसह १४ वाघ आहेत. पांढराही वाघ आहे. उद्यानात आतापर्यंत दोन नर-मादी जोडय़ांपासून ४० वाघ जन्माला आले आहेत. त्यातील सोळा वाघ इतर ठिकाणच्या प्राणिसंग्रहालयास देण्यात आले आहेत.

– डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक, सिद्धार्थ उद्यान