पाकिस्तानबाबत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची भावना

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

टोमॅटो विरुद्ध अणुबॉम्ब अशी विचित्र ‘पेरणी’ चर्चेत असलेल्या दिवशी औरंगाबाद तालुक्यातील वरुडकाझी गावातील शेतकरी गोरख बिघाटे सांगत होते- ‘गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला भाव मिळालाच नाही. काही दिवसांपूर्वी टॉमेटो पाकिस्तानला निर्यात झाला असता तर दोन पैसे अधिक हाती पडले असते. तेव्हा नुकसान सहन केले. आता एकदा धडा शिकवाच. नफा-नुकसानीचे बघून घेऊ.’ जुलै ते डिसेंबर या कालावधीत वरुडकाझीतून दररोज १२ ते १५ मालमोटारीने पाकिस्तानला टोमॅटो पाठवला जातो. गावातील साडेचारशे एकरापैकी अडीचशे एकर  टोमॅटोचेच पीक घेतले जाते. ‘जेव्हा निर्यातीचा निर्णय आवश्यक होता, तेव्हा तो घेतला गेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तानला टोमॅटो दिला काय किंवा नाही काय,’ अशी प्रतिक्रिया याच गावातील संजय दांडगे यांची. देशभरातून पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, श्रीलंका, दुबई या देशांमध्ये टोमॅटोची ८० हजार टनांपर्यंतची निर्यात केली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून अशी निर्यात पाकिस्तानबरोबर झालेली नाही. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी निर्यात झाली नसल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

औरंगाबाद तालुक्यातील वरुडकाझीमधील शेतकरी टोमॅटोशिवाय अडीचशे एकरात अन्य कोणतेही पीक घेत नाही. साधारणत: जून ते डिसेंबर असा टोमॅटो उत्पादनाचा आणि विक्रीचा कालावधी असतो. दोन महिन्याचे हे पीक घेणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांना अलीकडे नुकसानच सहन करावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून किमान ५० रुपये ते कमाल १५० रुपये टन एवढाच दर राहिला. जर पाकिस्तानला निर्यात झाली असती तर ७५० ते ८०० रुपये टनापर्यंत शेतकऱ्यांना दर मिळाला असता. पण गेल्या सहा महिन्यांपासून तशी निर्यात झाली नाही. परिणामी भाव गडगडते राहिले. सध्या २५० रुपये टनापर्यंत टोमॅटोचे दर आहेत. एक एकर टोमॅटो लावून काढणीपर्यंतचा खर्च साधारणत: ७५ हजार रुपये एवढा येतो. त्यामुळे टोमॅटोची शेती परवडत नाही. पण सातत्याने एकच पीक घेतल्याने एखाद्या मोसमात खूप अधिक भाव मिळतो आणि नुकसान भरून निघते. त्या जोरावरच टोमॅटो पिकवणारे शेतकरी लागवड करत असतात. गोरख बिघोट म्हणाले, ‘सध्या माझ्या शेतात टोमॅटो नाहीत. आम्ही ते व्यापाऱ्यांना दिले आहे. पण गेले वर्षभर टोमॅटोला भाव नव्हताच. आम्ही ते अक्षरश: जनावरांपुढेसुद्धा टाकले. अगोदर निर्यात झाली असती तर दोन पैसे मिळाले असते. आता आमच्या हातात फारसे पीक नाही. तेव्हा धडा शिकवायचा असेल तर शिकवायला हरकत नाही. पण त्याच्यानंतर टोमॅटोला भाव मिळायला हवे, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे.’ नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ात उन्हाळी टोमॅटो घेतले जातात. पण तुलनेने भाव कमीच आहेत. दरांचा हा गोंधळ सुरू असतानाच पाकिस्तानला टोमॅटो न देऊन दिली जाणारी खुन्नस उपयोगी आहे काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानला टोमॅटो दिला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, तेव्हा निर्यात झाली नाही. साधारणत: टोमॅटोची निर्यात पाच देशांना होते. हा आकडा ८० हजार टनांपर्यंतचा आहे. गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तानला टोमॅटो पाठविलेला नाही.

-पाशा पटेल, अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग