केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या हत्येनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच औरंगाबादमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांनी एका कुत्र्याला दोरीने दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबादमधील एक 14 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये एका दुचाकीवरून दोघेजण कुत्र्याच्या गळ्याभोवती दोरी बांधून फरपटत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. त्या दुचाकीच्या मागून येणाऱ्या एका चार चाकी गाडीमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर श्वान प्रेमी संघटनेच्या लोकांनी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. तसेच, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हळहळ व्यक्त करत पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा व्हिडिओ पाठवून दखल घेण्यास सांगितले होते.


पाच जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. शनिवारी याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकांपैकी एक अल्पवयीन आहे तर दुसरा आरोपी १९ वर्षांचा असून शहराच्या वाल्मिकी नगर परिसरातील रहिवासी असल्याचं समजतंय.