रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण शुक्रवारी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदींचा निषेध केला.

मी इंजिनियर आहे…मी एमबीए केलंय… मी बीएड पूर्ण केलं आहे…असे फलक हाती घेत काही तरुण शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांच्या हातातील ‘नो जॉब नो जॉब,पकोडा शॉप पकोडा शॉप’ हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणे हे काम करणं चूकीचे नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने अभ्यास करून वडिलांचा आर्थिक ताण सहन करत डिग्री मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचे काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदींनी माफी मागावी किंवा आयटी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा सटॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली.