समारोपाला अभिनेत्री श्रेया बुगडे, संजय कुलकर्णी यांची उपस्थिती

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घेण्यात आलेल्या चारदिवसीय केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी अभिनेत्री श्रेया बुगडे व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, अभिनेते संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. कलागुणांच्या विविध स्पर्धामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद उस्मानाबाद जिल्हय़ातील महाविद्यालयांचा वरचष्मा राहिला. ढोल-झांजेचा निनाद व त्यावरील नाच-ताल, शिट्टय़ांच्या आवाजांनी विद्यार्थ्यांनी दणाणून सोडलेल्या सभामंडपात उत्साहात पारितोषिकांचा स्वीकार करण्यात आला.

युवा महोत्सवातील उत्कृष्ट संघ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पारितोषिक पटकावले. विद्यापीठाने नृत्य गट, ललित कला गटासह इतरही अनेक प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने ठसा उमटवला. तर उत्कृष्ट ग्रामीण संघ ठरला कन्नडचे शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. औरंगाबादच्याच देवगिरी, एमजीएम, सरस्वती भुवन, सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालय, विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंह वाणिज्य व विज्ञान, शासकीय विज्ञान, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, वाळूजचे दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आदींनी वेगवेगळय़ा कलाप्रकारांमध्ये पारितोषिके पटकावली. उस्मानाबाद जिल्हय़ातील उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, तुळजापूर व तालुक्यातील सलगरा (दि.), कळंबचे मोहेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही विविध कलाप्रकारात ठसा उमटवल्याबद्दल गौरवण्यात आले. बीडचे केएसके, वडवणी, गेवराईचे र. भ. अट्टल व शिरूर कासारचे कालिकादेवी महाविद्यालय, परळी वैजनाथ येथील तर जालन्याचे बद्रिनारायण बारवाले, बगाडिया महाविद्यालय व अंबडचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवातील कलाप्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली. विद्यापीठात या वर्षी प्रथमच जलसा व कव्वाली कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. पारितोषिकाच्या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्रा. संभाजी भोसले, प्रा. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. दासू वैद्य, प्रो. मुस्तजीब खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘लक्ष्य’ केंद्रित करा- बुगडे

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करावे व ते प्राप्त करण्यासाठी शक्ती एकवटावी. लक्ष्यापासून दूर नेणाऱ्या अनेक मोहून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. त्यापासून सावध राहावे. आपला मार्ग चुकीचा ठरणार नाही, याबाबत जागरूक राहावे. चुकलो तरी त्यातून शिकत जा. नैराश्याच्या गर्तेत अडकू नका. तुमच्या घरातील संस्कार आयुष्याचा पाया आहे.

महाविद्यालयांमध्ये नाटय़शास्त्र विभाग हवा- कुलकर्णी

अभिनेते संजय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आजच्या युगाला अनुसरून स्मार्ट व्हावे. स्वत:चे मार्केटिंग करण्याचे कसब शिकून घ्यावे. काळाची ती गरज आहे. प्रत्येक माध्यमाशी सलोख्याचे संबंध ठेवावे. नाटय़शास्त्र विभाग प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करण्याची गरज आहे. त्यातून कलाप्रेमी, किमान सुजाण नागरिक तरी घडतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवातील विजेत्यांना अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता संजय कुलकर्णी यांच्या हस्ते विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडेंसह प्राध्यापकवृंद.