औरंगाबादमधील हिंसाचाराप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचारातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेंद्र जंजाळ हे तिथे उपस्थित असल्याने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शिवसेना नगरसेवकाला अटक होताच शिवसैनिकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तीन- चार किरकोळ घटनांचे पर्यवसन दोन गटातील हाणामारीपर्यंत गेले आणि शहरात हिंसाचार झाला होता. मोती कारंजा भागातून सुरु झालेला हा हिंसाचार जुन्या शहरात पसरला. दुकाने आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार पहाटेपर्यंत सुरु होते. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. तर ५१ हून अधिक जखमी झाले होते.

मंगळवारी सकाळी औरंगाबाद पोलिसांनी दंगलीप्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुपारी त्यांना अटक करण्यात आली. हे वृत्त समजताच शिवसैनिकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. यानंतर शहरातील काही भागांमध्ये दुकानेही बंद करण्यात आली. यामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण स्थिती होती.

दरम्यान, औरंगाबाद येथे शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा दावा शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्यावतीने करण्यात आला होता. पेट्रोल आणि रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ दंगलग्रस्त भागात एवढ्या मुबलक प्रमाणात कसे पोहोचले, असा प्रश्न दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी उपस्थित केला.