मनालीजवळील चौदा हजार फूट उंच शिखर सर

औरंगाबाद : जमिनीपासून १४ हजार १०० फूट उंच, संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश, जोराने वाहणारे थंड वारे आणि कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातील हिमाचल पर्वत रांगांमधील भृगु लेक शिखर औरंगाबादच्या सहा, तर नाशिक, संगमनेर, बुऱ्हाणपूर येथील दहा गिर्यारोहकांनी मिळून  नुकतेच सर केले. यातील बहुतांश गिर्यारोहक हे अवघ्या १७ ते १८ वयोगटातील आहेत.

महाराष्ट्रातील कमांडर विनोद नरवडे, एव्हरेस्टवीर रफीक शेख व प्रांतोष वाघमारे यांच्यासह कीर्ती व लालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. या मोहिमेसाठी औरंगाबादचे रणवीरसिंग देवरे, आर्यन आदाणे, छत्रपती खरोटे, शैलेश राकटे, सचिन धवसे व नितीन धवसे यांचा समावेश आहे. तर संदीप आवारे, नितीन दराडे, सोलोमन सोनवणे, कमलेश सुरवाडे, विनय सोनवणे, संतोष देवरे, संदीप आव्हाड, रमेश केदारे, वाल्मीक बागुल, राजेश निकुंभ, राहुल दुधवडे व राजेंद्र सोनवणे हे १४ मे रोजी मनालीमध्ये पोहोचले. एक दिवस वातावरणाशी जुळवून घेतले. कुणती वाइल्ड लाईफ सॅन्च्युरी येथे सराव केला व १५ मे रोजी भृगु लेक शिखराकडे चढाई करण्यास सुरुवात केली व ९ हजार ८०० फुटावरील मोरी दूध येथे पोहोचले. १६ मे रोजी भृगु लेक मार्गावरील कॅम्प २ पर्यंत पथक पोहोचले. मात्र, तेथे काही सहकाऱ्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे १८ पैकी सहा जण तेथेच थांबले. १७ मे रोजी भृगु लेकसाठी वाटचाल सुरू केली. काही तासातच मोहीम फत्ते झाली, असे यात सहभागी झालेले नितीन धवसे यांनी सांगितले. या मोहिमेसाठी माऊंटेनिअिरग संघटनेच्या ज्योती थोरात, वसंतराव धवसे, प्रकाश थोरात यांच्यासह रमेश केदारे, संतोष खरे यांचे सहकार्य लाभल्याचे नितीन धवसे यांनी सांगितले.