करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा गेल्या सात दिवसातील औरंगाबादचा दर १०.४३ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३८.१४ एवढे आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचा दरही सध्या ३.३४ एवढा आहे. १५ मार्च रोजी औरंगाबाद येथे विदेशातून आलेल्या एका महिलेला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून करोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात १० रुग्ण होते. एप्रिल २० पर्यंत ही संख्या शंभपर्यंत गेली होती. या काळात गर्दी करू नका असे सांगताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते. काही मोहल्लयांमधून करोना चाचणीला विरोध होत असे. केले जाणारे सर्वेक्षण नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) किंवा राष्ट्रीय सुरक्षा नोंदणी  (एनआरसी) साठी नाही, हे सांगण्यातच महापालिका कर्मचाऱ्यांना त्रास होत असे, पण औरंगाबादकर संपर्क वाढवत गेले. याच काळात चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला. लक्षणे नसणाऱ्या पण संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने सकारात्मक येऊ लागले.‘वाढीचा हा वेग दिवसाला १०० पर्यंत गेला. पण तो कायम राहिला नाही. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढेल पण त्याच्या प्रसाराचा वेग आटोक्यात राहू शकतो, असा दावा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी‘ लोकसत्ता’ शी बोलताना केला.

औरंगाबाद शहरात दोन दिवसांपूर्वीपर्यंत ९  हजार ४८ नमुने तपासण्यात आले. सात आठवडय़ातील हा वेग चौथ्या आणि पाचव्या आठवडय़ात वाढविण्यात आला होता. स्मार्ट सिटी बसमधून संपर्कातील व्यक्तीचे नमुने घेतले जात होते. तिसऱ्या आठवडय़ामध्ये रुग्णवाढीच्या दुपटीचा वेग १६.८६ एवढा होता. आता सातव्या आठवडय़ात तो ९.६६ एवढा झाला आहे.

दर दशलक्ष व्यक्तींमागे करोना चाचणीचा दर काढला जातो. मुंबई, चेन्नई आणि औरंगाबाद या शहरातील करोना चाचणीचे प्रमाण लक्षात घेता औरंगाबादमध्ये ५०७८.६३ असा त्याचा दर आहे. जो देशभरातील चाचण्यांमध्ये अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई, माजलगाव आणि औरंगाबाद या तीन शहरात रुग्ण वाढीचा दर काहीसा सारखा असल्याचेही विश्लेषण केले जात आहे. दरम्यान शहरातील १०० हून अधिक भागांमध्ये करोनाने पाय पसरले. १२ प्रतिबंधात्मक क्षेत्र आखण्यात आले. एकूण शहराच्या मानाने काही वस्त्यांमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत गेले. एकूण महापालिका क्षेत्राच्या केवळ नऊ टक्के क्षेत्र हे प्रतिबंधात्मक भाग आहे.

या भागातील रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पायी गस्तही करावी, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. प्रतिबंधात्मक क्षेत्रापैकी जयभीमनगरमधील रुग्ण दुप्पट होण्याचा दर २४.८५ एवढा आहे. किलेअर्क, मुकुंदवाडी येथील हा दर १८.७६ एवढा होता. तर नूर कॉलनी आणि समतानगर या भागात गेल्या सात दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

प्रत्येक गल्लीमध्ये किंवा सोसायटीमध्ये करोना रुग्ण वाढीचा वेग तपासला जात आहे. गेल्या काही दिवसात शंभर रुग्ण सापडण्याचा वेग होता. तो आता ६० रुग्णांपर्यंत खाली आला आहे. एखाद्या वसाहतीमध्ये किंवा वस्तीमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर काळजी घेण्याचे प्रमाण वाढते. त्यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात येते. शहरातील लोक जोपर्यंत अंतर राखून, नाकाला रुमाल बांधून सातत्याने हात धुण्याचे प्रयोग अंगीकारणार नाहीत, तोपर्यंत या आजारावर नियंत्रण मिळविता येणे अवघड असेल,असे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय आवर्जून सांगतात.