शिवसेनचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कुठलिही तयारी नसतांना २३ डिसेंबरला स्मार्ट सिटीतील स्मार्ट बसचे लोकार्पण करण्याची घाई करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही ही सेवा सुरू झालेली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करत सुरुच करायची नव्हती तर नागरिकांची दिशाभूल कशाला केली अशी चर्चा अनेक दिवसापासून शहरात सुरु होती. यापूर्वी, २४ जानेवारीपासून बसचा प्रारंभ होणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले होते. मात्र, बुधवारी दि.१६ पुन्हा एकदा स्मार्ट बसच्या प्रारंभाचा मुहूर्त बदलला गेला. आता स्मार्ट बस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ तारखेला शहरात धावणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

पालिकेची स्मार्ट बस सेवा पूर्ण क्षमतेने २४ जानेवारीपासून सूरू होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले होते. त्याकरिता टाटा कंपनीने सूरूवातीला ५ बसेस पाठवल्या असून या बसेस शहरातील प्रमुख मार्गावर धावत आहे. उर्वरीत २३ बसेस मागील आठवड्यातच शहरात दाखल झाल्या आहे. या बसेसचा विमा काढण्यात आला असून आरटीओची पासिंग करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. २८ पैकी २४ सिटीबस १४ मार्गावरून धावणार आहे. एक बस शहर दर्शनासाठी असणार आहे.

तीन बसेस राखीव ठेवल्या जाणार आहे. या सिटीबसमध्ये स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सिट आरक्षीत करण्यात आले आहे, अशी माहिती त्यावेळी महापौरांनी दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा महापोरांनी तारीख बदलून ती २३ जानेवारी केली आहे. या दिवशी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने या औचित्याच्या मुहूर्तावरच स्मार्ट बसचा प्रारंभ करण्याचे नियोजन आता पालिकेने केले आहे, बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी ही घोषणा केली.

लोकार्पण झालेल्या पाच पैकी एकही बस सुरु नाही
महापौर घोडेले यांनी सांगितले की, लोकार्पण करण्यात आलेल्या पाच बस शहराच्या मुख्य मार्गावर धावत आहे.याबाबतीत राज्यपरिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या पाच बसचे लोकार्पण झाले त्या पैकी एकही बस सुरु करण्यात आले नाही.यासाठी एससीडीसीएल व महामंडळ मध्यवर्ती परवानगी घ्यावी लागते मला बस सुरु करण्याचे कुठलेही अधिकार नसल्याचे भुसारी यांनी सांगितले.