औरंगाबादमध्ये एमआयएम आणि वंचितकडून पुन्हा एकत्र येण्यासाठी चाचपणी

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी प्रचारामध्ये ‘ज्याचे-त्याचे हिंदुत्व’ असा नारा भाजप-शिवसेना आणि मनसेकडून दिला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या अनुषंगाने चाचपणी करू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ म्हणाले, ‘त्यांनी प्रस्ताव दिला तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पण अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.’

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीस उभे राहण्याची इच्छा असणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी संपर्क करायला सुरुवात केली आहे.  गेल्या वेळी  शिवसेना-भाजपने युती केली होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही दोन्ही पक्ष एकाच बाजूचे आहोत, असे दाखविले जात होते. यावेळी कोणाचे हिंदुत्व अधिक प्रखर असे सांगण्यासाठी खासे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी केल्याने त्यांचे हिंदुत्व सौम्य झाल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, ही मागणी त्यातूनच पुढे आणली जात आहे. प्रमुख दोन पक्षांमध्ये आमचे हिंदुत्व खरे असे सांगण्याचे प्रयत्न सुरू असताना मनसेनेही निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचे ठरविले असून ५०हून अधिक जागा लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते. बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलून द्यावे अशी भूमिका घेत मनसेही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘ज्याचे-त्याचे हिंदुत्व’ अशी नवी प्रचार रचना महापालिका निवडणुकीत दिसून येईल, असा अंदाज आहे.

एका बाजूला हिंदूबहुल भागातील वॉर्डामध्ये हिंदुत्व रक्षणाचे तीन पक्ष आणि दुसरीकडे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असा सामना रंगेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शहरामध्ये तशी फारशी ताकद नाही. त्यामुळे त्यांची आतापर्यंतची आंदोलने लक्षणीय ठरली नाहीत. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आघाडी करण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगण्यात येते. या आघाडीबाबत मार्चमध्ये चर्चा होऊ शकते, असे अलीकडेच मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे पुढील महिन्यात महाविकास आघाडी होणार की काँग्रेस-राष्ट्रवादी होणार, हे समजणार आहे. महाविकास आघाडीसाठी शिवसेनेकडे आडकाठी येऊ दिली जाणार नाही, असे सेना नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर तुलनेने कुपोषित असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या, याविषयी शिवसेनेत शंका घेतल्या जात आहेत. कोण निवडून येऊ शकतो आणि कोण पडू शकतो याचे अंदाज घेतले जात असून भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या आधारेच जो व्यक्ती निवडून येण्याची क्षमता असलेला आहे त्याला उमेदवारी दिली जाईल. तत्पूर्वी वॉर्डाच्या बैठका घेणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी सांगितले.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासमवेत सुहास दाशरथे, प्रकाश महाजन यांनीही प्रवेश घेतला असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत ५०हून अधिक जागा लढविण्याची तयारी केली जात आहे. शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये स्वतंत्र सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप

शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. त्यातून १६८० कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. त्याला स्थगिती देण्याचे काम शिवसेनेने केले, असा आरोप करत पाण्याच्या आणि कचऱ्याच्या भोवती ही निवडणूक शिवसेनेला जड जावी, असे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहे, तर आता कचऱ्याचा प्रश्न फारसा उरला नाही आणि समांतर जलवाहिनीला भाजपने विरोध केल्यामुळेच नवी योजना आणावी लागली आणि त्याची किंमतही वाढली, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची धुरळा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा अधिक उडेल असे सांगण्यात येत आहे.