औरंगाबाद येथे शिवसेनेच्या माजी महापौरांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनोने यांनी नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता सोनोने यांनी आज गुरूवारी मनसेमधे प्रवेश केला आहे. सुदाम मामा सोनोने यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. सुदाम सोनोने यांच्याबरोबरच शिवसेनेचे सचिन सोनोने आणि भाजपाचे कामगार नेते राहुल सोनोने यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे.  मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सुदाम सोनावणे यांचा सिडको हडको भागात दबदबा असून ते कुशल संघटक मानले जातात. नारायण राणे यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती . नारायण राणे यांच्या बरोबर त्यांनी काँग्रेस पक्षातही प्रवेश केला होता पण तेथे त्यांचे मन रमले नाही. औरंगाबादचे महापौर म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली होती .

शिवसेनेचे नगरसेवक व भाजपा कामगार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनीही मनसेमध्ये प्रवेश घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती संध्याकाळीपर्यंत मिळेल असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील सुभेदारी विश्रामगृहात मेळाव्यात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने तालुकानिहाय, जिल्हानिहाय आणि वार्डनिहाय असलेल्या अडचणी व त्यावर उपाय यावर चर्चा झाली. तसेच आज झालेल्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते औरंगाबाद शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार असल्याचे वृत्त आहे.