औरंगाबाद :  शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते हातगाडी, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय मंगळवारी रस्त्यावर उतरले; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सतर्क केल्यामुळे हातगाडीचालक पळाले व महापालिकेने कुंभारवाडय़ातील अतिक्रमण काढले.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळक पथ, पठणगेट, कुंभारवाडा, मच्छलीखडक, सराफा, शहगंज भागाला हातगाडय़ांचा विळखा पडला आहे. रस्ते अरुंद असताना त्यात व्यापाऱ्यांनी पाच-फुटापर्यंत तर त्यापुढे हातगाडी चालकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील अवघड होत आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन हातगाडय़ांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेने कारवाई केली नाही तर बंद पाळण्याचा इशारा पठण गेट, टिळक पथ येथील व्यापाऱ्यांनी दिला होता. व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी पावणेबारा वाजता महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय गुलमंडीवर आले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्यासह अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, आदेशपालसिंग छाबडा यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली.

३० अतिक्रमणे पाडली

हातगाडय़ांमुळे आम्हाला व्यवसाय करणे अवघड  झाले आहे, असे सांगत पुरावे म्हणून छायाचित्र आयुक्तांना दिले. त्यानंतर आयुक्तांनी कुंभारवाडय़ाकडे मोर्चा वळविला. या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर पत्र्याचे शेड करून पाच ते दहा फुटांपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांना रस्त्यावर आलेला दुकानांचा भाग जेसीबी लावून पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन जेसीबी लावून २० ते ३० अतिक्रमणे पाडण्यात आली.