पोलीस भरतीत डमी उमेदवार उभे करून गुणवत्ता यादीत आणणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. एप्रिलमध्ये ठाणे शहर पोलीस भरती प्रक्रिया झाली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तेजराव साबळे आणि भारत रुपेकर या दोन विद्यार्थ्यांचं गुणवत्ता यादीत नाव आलं. मात्र या विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार उभे करून ही भरती प्रक्रिया पार पडल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. गुणवत्ता यादीत आलेल्या या दोन विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी दुसऱ्याच दोन विद्यार्थ्यांनी दिली. तसेच लेखी परीक्षा अन्य दोघांनी दिली. अशा ६ जणांपैकी ५ जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मैदानी चाचणीसाठी झनक चरांडे आणि वहाब शेख या दोन डमी उमेदवारांना उभं करण्यात आलं होत. त्यासाठी त्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार होते. त्यांनी ९० आणि ९१ गुण मिळवले. त्यांनतर लेखी परीक्षेसाठी राजू नागरे आणि दत्त नलावडे यांना बसवण्यात आलं. त्यासाठी त्यांना ४ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांनी देखील ८० आणि ८१ गुण मिळवले.

त्यांच्याच गावातील आनिल डोईफोडे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ ५ जणांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपी फरार आहे. आरोपींकडून लॅपटॉप एअर फोन जप्त करण्यात आले असून २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इयर फोनच्या माध्यमातून उत्तरपत्रिका सोडवण्यात येत होती. या प्रकरणात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा पोलीस तपास करत आहेत.