X

औरंगाबाद भूमिगत गटार घोटाळा: ‘प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करा’

आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता. लेखापरीक्षण अहवालावरून त्याला पुष्टी मिळाली असून यासंदर्भात बुधवारी पालिकेत विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सभापती गजानन बारवाल यांनी प्रकल्प अधिकारी अफसर सिद्धिकी यांना निलंबित करण्याची सूचना आयुक्तांकडे केली आहे. तसेच प्रकल्प व्यवस्थापन समितीला काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितले.

भूमिगत गटार योजनेच्या कामासंदर्भात स्थायीच्या बैठकीत नगरसेवकांनी वारंवार तक्रार केल्या. त्यानंतर योजनेचं ऑडिट करण्यात आले. अनियमितता झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष बैठकीत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी प्रकल्प अधिकारी सिद्धिकी यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मागील पंधरादिवसांपूर्वी पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होते. त्यावेळी नाल्यावर अतिक्रमण झालं असल्याचे आरोप झाले. दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.

विशेष बैठकीला आयुक्तांनी स्वतः हजर राहावे, अशी विनंती बारवाल यांनी केली होती. मात्र नेहमी प्रमाणे आयुक्तांच्या प्रतिनीधीने बैठकीला हजरी लावली. सभापतींच्या सूचनेवर आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: October 4, 2017 5:04 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain