औरंगाबाद जिल्हा परिषद प्रशासनाने ३ हजार रूपयांची कचराकुंडी १७ हजारांत खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तीन हजारात मिळणाऱ्या कचराकुंडीची तब्बल १७ हजारात खरेदी केल्यामुळे सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी गोंधळल्याचे दिसून आले.
सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी दलित वस्तीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपकारातून वाचनालय आणि कचराकुंडी देण्याची योजना होती. यासाठी एक कोटींच्या निधीची तरदूत करण्यात आली होती. यात ५० लाखांत वाचनालय आणि ५० लाखात कचरा कुंडी वाटपाची आखणी होती.
बजारामध्ये कचराकुंडी ही ३ हजार रूपयात मिळते परंतु हीच कचराकुंडी १७ हजारात कशी खरेदी केली असा प्रश्न सदस्य एल.जी.गायकवाड यांनी उपस्थित केला. तरी यामध्ये गैरव्यवहार झाला असून यात सामान्य प्रशासनाचाही वाटा असल्याचा आरोप त्यांनी केला.
नऊ बीडीओंनी २६७ ग्रापंचायतींकडून कचरा कुंडी मिळाल्याचे दाखवून धनादेश घेतले. याचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे चेक कचरा कुंडी देणाऱ्या एजन्सीला द्यायचे असा हा प्रकार होता. हा निधी ग्रामपंचायतीच्या चालू खात्यात जमा करायचा. यानुसार एजन्सीचे चेक क्लिअर झाले. विस्तार अधिकारी समाजकल्याण आणि बीडीओंनी तालुक्यात फिरून चेक जमा केले. सरपंच व ग्रामसेवकांनी यावर सह्या केल्या. ग्रामसेवकांकडून चेक घेण्यासाठी तालुका स्तरावर बीडीओंच्या मिटिंग घेतल्या गेल्या. यासाठी विशिष्ट फॉर्मेट असेलला फॉर्म बनवण्यात आला. वाटप झालेल्या निधीतील कचरा कुंडयांच्या किमतीत मोठी तफावत असून, यात प्रशासन देखील गुंतलेले असल्याचा आरोप सदस्य एल जी गायकवाड यांनी केला असता यावेळी स्पष्टीकरण देताना प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 8:30 pm