मराठवाडा आणि नगर-नाशिकच्या पाणी संघर्षांवरील उपाययोजना म्हणून ऑस्ट्रेलियातील मरेडार्लिग येथे समन्यायी पाणीवाटपाची संगणक प्रणाली सप्टेंबर २०१७पर्यंत पूर्ण केली जाईल. ऑस्ट्रेलियातील ई-वॉटर संस्थेचे कार्ल डेमियन व करीना रेडाफ या तज्ज्ञांनी गोदावरी पाटबंधारे मंडळातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या नव्या प्रणालीमुळे नगर-नाशिक जिल्हय़ांतून कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे आणि कोणत्या कालावधीत ते सोडल्यास अधिक उपयोगी होईल, याबाबतचा निर्णय घेणे अधिक सोयीचे होणार आहे, असे गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले.
नगर-नाशिक आणि मराठवाडा या पाणी संघर्षांच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी हिरालाल मेंढेगिरी यांची समिती नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार पाणीवाटपासाठी प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याची शिफारस केली होती. मरेडार्लिग येथील पाण्याची स्थिती, तसेच जायकवाडीचा पाण्याचा प्रश्न जवळपास सारखाच असल्याने तेथे कशा पद्धतीने पाणीवाटप होते, याचा अभ्यास करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सबरोबर महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीविषयी करार केला. यासाठी ५४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. संगणकावर वेगवेगळo पद्धतीने अभ्यास करून कोणते सूत्र पाणीवाटपासाठी अधिक सुयोग्य असेल, याची माहिती करून देणारी रिअल टाइम डेटा सिस्टम विकसित केली जाणार आहे. याशिवाय गोदावरी पाटबंधारे मंडळातील अधिकाऱ्यांना ही प्रणाली वापरण्यासाठीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
जायकवाडीच्या वरच्या बाजूला १८ धरणे आहेत. त्यामुळे कोणत्या धरणाकडून किती पाणी सोडायचे, हे ठरवता येणे या प्रणालीमुळे अधिक सुकर होणार आहे. ऑस्ट्रेलियातील दोन्ही तज्ज्ञांनी त्यांच्या प्रणालीविषयीची माहिती गोदावरी पाटबंधारे मंडळातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिली.