औरंगाबाद : एमआयएमने जागावाटपात बहुजन वंचित आघाडीकडे ७४ जागा मागितल्या खऱ्या, पण त्यांना केवळ आठ जागा मिळतील असे एमआयएमला कळविण्यात आले. असे करताना ‘एमआयएम’ ने एकाही जागेवर दलित व्यक्तीला उमेदवारी द्यायची नाही अशी अट टाकण्यात आल्याने बहुजन वंचित आघाडीमध्ये बिनसले असल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगाव (मध्य), जळगाव, हिंगोली, औरंगाबाद (पूर्व), सोलापूर (मध्य), भायखळा, चांदिवली व उदगीर या आठ जागा दिल्या जातील असे कळविण्यात आले. या जागांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ एक जागा देण्यात आली. त्यामुळे पुढील बोलणी जवळपास फिसकटली आहेत. आम्ही काही जागा कमी करण्यास तयार होतो, पण केवळ आठ जागा मान्य होणार नाहीत, असे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सुरुवातीच्या टप्प्यात ‘एमआयएम’ ने ९८ जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर २४ जागा कमी करण्यात आल्या. मात्र, केवळ आठ जागा दिल्या जातील असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कळविले. यामध्ये ज्या जिल्ह्यात पक्षाचा खासदार आहे त्या जिल्ह्यातही केवळ एक जागा दिली जाईल असे सांगण्यात आले. औरंगाबाद मध्य या मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले होते. मात्र, ती जागाही बहुजन वंचित आघाडीकडेच राहील, असे सांगण्यात आले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भारिपचे अमित भुईगळ यांना उमदेवारी देण्यासाठी बहुजन वंचितचे नेते आग्रही आहेत. जरी ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी एकनिष्ठ असले तरी त्यांची विजयी होण्याची शक्यताही तपासण्याची आवश्यकता आहे. तसे पाहिले जात नाही, असा एमआयएमचा आक्षेप आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ ने २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. भायखळा आणि औरंगाबाद मध्य या दोन मतदारसंघात या पक्षाला विजय मिळाला होता. औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघ, नांदेड (मध्य) व नांदेड (उत्तर), परभणी, सोलापूर(मध्य)सह अन्य दोन मतदारसंघ , भंडारा, वर्सोवा, मालेगाव, मुंब्रा, कुर्ला, भायखळा, भिवंडी (पश्चिम) चांदीवली, मुंबादेवी, सायन,अक्कलकोट या मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. यामध्ये किमान आणखी सहा जागा अधिक मिळाल्या तर बोलणी सकारात्मक होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी दलित व्यक्ती उमेदवार होण्यास इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी अट टाकल्याने सारे घोडे अडले आहे. पुणे येथे गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये  सकारात्मक चर्चा घडली तरच पुढील बोलणी होऊ शकेल, अन्यथा सारे अवघड होऊन बसेल, असे एमआयएमच्या वतीने सांगण्यात आले.