समाजासमोर आज आदर्शच शिल्लक नाहीत अशी व्यक्त होणारी खंत आपण नेहमीच अनुभवतो. मात्र थोडे डोळे उघडून पाहिले तर आदर्श शोधण्यासाठी आपल्याला फारशी धडपड करावी लागत नाही. तर आपली दृष्टी बदलावी लागते, हे औरंगाबाद जिल्हय़ातील औरंगाबाद तालुक्यातील बकापूर-श्यामवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीने कृतीतून दाखवून दिले आहे.

औरंगाबाद शहरापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावरील या गावात २००७ साली एकही शौचालय नव्हते. तत्कालीन सरपंच सुदाम पळसकर व गावकऱ्यांनी एकाच वर्षांत गावात १४५ घरांपकी सर्व घरात शौचालय बांधून निर्मलग्राम पुरस्कार मिळविला. दुसरे वर्षी गावकऱ्यांनी थोडासा कंटाळा केला. आजूबाजूचे ग्रामस्थ स्थलांतरित होऊन गावात राहायला आले. त्यातून गावची कुटुंबसंख्या २३६ वर पोहोचली व लोकसंख्या १६३५ वर गेली. पुन्हा २०१५ मध्ये गावकऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सहभाग देण्यासाठी प्रयत्न केले.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
farmer protest marathi news, farmer protest for msp, minimum support price marathi news
टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

गावच्या सरपंच आसिफाबी शेख तर उपसरपंच कमलबाई पळसकर दोघी महिला. या दोघींनी गावात बदल घडवून आणण्याचा निश्चय केला. त्याला सर्व गावकऱ्यांनी साथही दिली. पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. गावात सहा सौरऊर्जा यंत्र बसवले व त्यावर एलईडी लाइट वापरणे सुरू झाले. गावातील प्रत्येक घराला कचराकुंडी देण्यात आली. ओला व सुका कचरा याच्या स्वतंत्र पिशव्या देण्यात आल्या. सर्व घरात नळयोजनेद्वारे पाणी सुरू झाले. सांडपाण्यासाठी शोषखड्डे करण्यात आले. आता सर्व २३६ घरात शौचालय उभे राहत असून १५ ऑगस्टपर्यंत हे गाव पुन्हा एकदा निर्मलग्राम होण्याच्या मार्गावर आहे.

वनविभागाच्या पुढाकाराने गावात ३२ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संतुलित ग्रामयोजनेंतर्गत ग्रामपंचायतीची १०० टक्के वसुली करण्यात आली आहे. गावातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकल्यामुळे रस्ते स्वच्छ झाले.

शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. २०१४-१५ साली गावाला संत गाडगे अभियान अंतर्गत दुसरे पारितोषिक मिळाले. ग्रामपंचायतीला व गावातील दोन्ही अंगणवाडय़ांना आयएसओ मानांकन मिळाले. गावालगतच्या नदीचे दोन किलोमीटरचे खोलीकरण केले. त्यामुळे विहिरी व िवधनविहिरीची पाणीपातळी वाढली. गावातील २५ टक्के शेती आता ठिबक सिंचनावर सुरू आहे. गावकऱ्यांनी १०० टक्के ठिबक सिंचन योजनेचे उद्दिष्ट ठरवले आहे.

२३६ पकी काही गरीब घरची मंडळी शौचालय बांधण्यासाठी पशाची गुंतवणूक करू शकत नव्हती, तेव्हा गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यासाठी स्वत: वस्तुरूपात मदत केली व अनुदान आल्यानंतर ते पसे परत घेण्याचे ठरवले. त्यातून सर्वाचाच सहभाग वाढला. आजूबाजूच्या गावची मंडळी उघडय़ावर शौचालयासाठी गावाच्या परिसरात येण्याच्या घटना रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पहाटे उठून अशा घटनांना प्रतिबंध केला. गावातील ७५ वर्षीय शांताबाई पळसकर यांनी, ‘गेल्या सात-आठ वर्षांत गाव झपाटय़ाने बदलले. वीज, पाणी, स्वच्छता याबाबतीतील बदल हा आमच्यासाठी सपान पडल्यासारखा असल्याचे सांगितले.’

या गावात आता गावकऱ्यांनी आरओ प्लँट बसवला असून ५ रुपयाच्या एटीएम कार्डद्वारे २० लिटर शुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यास दिले जाते. वापरण्यासाठीचे पाणी नळाद्वारे तर पिण्यासाठीचे पाणी लोक जारद्वारे घेऊन जातात. भविष्यात रिक्षाद्वारे हे बंद जारमधील पाणी घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करण्याचे ठरवले आहे.

ग्रामसेवक, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद सदस्य व सर्वच लोकप्रतिनिधी यांचे या गावातील बदलाकडे लक्ष असल्यामुळे या गावाची वाटचाल आता आदर्श गावाकडे सुरू आहे. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी पाठोपाठ त्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याचे बकापूरने ठरवल्याचे दिसत असून हे गाव पाहिल्यानंतर आपोआपच कोणाच्या तोंडातून ‘बकापूर बकअप’ असाच शब्द बाहेर पडतो.