सुहास सरदेशमुख

करोना विषाणू प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीची झळ तिरंग्याच्या निर्मितीलाही बसली आहे. जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांतील ‘स्वतंत्र’ टाळेबंदी आदेशामुळे या वर्षी ध्वजनिर्मितीतून केवळ ३४ लाख रुपयांचेच उत्पन्न खादी ग्रामोद्योग संस्थेला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते निम्मे आहे.

गेल्या वर्षी ध्वजनिर्मितीतून ७६ लाख रुपयांचे ध्वजमूल्य मिळाले होते. देशात नांदेड आणि कर्नाटकातील हुबळी या दोन जिल्ह्य़ांत तिरंगा ध्वज बनवला जातो. टाळेबंदीमुळे नवा ध्वज खरेदी करण्यासाठी शाळा आणि शिक्षक पुढे आले नाहीत. तसेच खादी ग्रामोद्योग केंद्र बंदच ठेवा, असे निर्देश असल्यामुळे तिरंगा निर्मितीतील ६०० हून अधिक मजुरांची अक्षरश: उपासमार होत आहे.

औसा, उदगीर, अक्कलकोट, कंधार येथे तिरंग्यासाठी लागणारी सूतकताई, विणकाम, रंगकाम आणि शिलाई आदी कामे केली जात. ती मार्चमध्ये बंद करण्यात आली. जुलैअखेरीस कसेबसे काम सुरू झाले आणि पुन्हा १५ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी लावण्यात आली. परिणामी, विक्री कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. लातूर येथील खादी उद्योग केंद्रात काम करणारे बब्रुवान पोतदार म्हणाले, ‘राष्ट्रध्वजा’ची विक्री तरी करू द्यावी, अशी विनंती केली होती, पण कोणी लक्ष दिले नाही. शेवटी मोटारसायकलवरून मुरुड येथे काही ध्वजांची विक्री केली. पण या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत निम्मे ध्वजही विकले गेले नाहीत.’ नांदेड येथील खादी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी खादी ग्रामोद्योग संस्था आणि तिरंगानिर्मिती संस्था अडचणीत असल्याचे सांगितले.

उदगीर येथील खादी ग्रामोद्योग संस्थेमध्ये वयाच्या ११ व्या वर्षांपासून तिरंगा बनविण्याच्या कामात असणाऱ्या कलावती दामावले म्हणाल्या, ‘जगणं मुश्किल झालं आहे. जूनमध्ये एक हजार रुपये मिळाले होते. त्यानंतर कामाचा मोबदला मिळाला नाही. सहा महिन्यांतील केवळ एक महिना काम करू शकले, त्याचेही पैसे अद्याप मिळालेले नाहीत. जगायचे कसे असा प्रश्न आहे. बाहेर आजाराची भीती आहे. स्वयंपाक करण्याचे काम मिळते का, ते पाहिले, पण त्यातही अनंत अडचणी आहेत.’

विणकामाचा दरही कमीच

विणकामाचा दर २० रुपये मीटर असून कष्टपूर्वक ‘ताना-बाना’ विणला गेला तर अडीचशे रुपयांची मजुरी मिळते. करोना संकट काळात ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कामास येऊ नका, असे सांगितले गेल्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे.

अडचणीचा डोंगर

माझ्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. तो तिकडेच राहायचा. दोन मुली पदरात होत्या. एक गेली. दुसऱ्या मुलीला शिकविण्यासाठी आयुष्यभर सूतकताई केली. कधी पैसे कमी मिळाले, कधी जास्त. कमाईत सातत्य नव्हते. पण मजुरी मिळत असे. तिरंग्यासाठी लागणारे सूत विणून आयुष्य काढले, पण वीण उसवलेलीच होती. हा काळ अत्यंत वाईट आहे. धड बाहेर जाता येत नाही आणि घरात काही काम नाही. अडचणीचा डोंगर एवढा आहे की, कोणाला काय सांगावे? अजूनही मला काम केल्याशिवाय पर्याय नाही. तरीही ध्वजारोहणासाठी जाणार आहे. त्यामागे एक स्वार्थही आहे. विचारून बघेन, मजुरी मिळते का?, असे सूतकताईवर घर चालवणाऱ्या कलावती दामावले यांनी सांगितले.

परित्यक्ता, विधवांचा रोजगार गेला : १०० मीटरच्या सूतकताईसाठी साडेसात रुपये मजुरी दिली जाते. एखादी व्यक्ती दिवसभरात २०० रुपयांपर्यंत मजुरी मिळवू शकतो. या व्यवसायात बहुतांशी विधवा आणि परित्यक्ता महिला आहेत. त्यातही मुस्लिम महिलांची संख्या लक्षणीय आहे.