सुहास सरदेशमुख

टाळेबंदीमध्ये लग्नसराईचे मुहूर्त संपून गेले. चार महिन्यांत अनेकांच्या हातचे काम गेले. जगण्याची भ्रांत निर्माण झाली; पण परिस्थिती सुधारेल, छोटय़ा कार्यक्रमांसाठी तरी वाजंत्रीवाल्याला बोलावून येईल अशी अशा होती. आता गर्दी जमवायची नाही, हा नियम बनला असल्याने लग्न किंवा सार्वजनिक  समारंभात बॅन्ड वाजविणाऱ्यांना आता मजुरीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे. वर्षभर मुहूर्त असले तरी वाजंत्रीचे सूर मात्र या वर्षी संकटात सापडले आहेत.

औरंगाबाद शहरातील मछलीखडक भागात बॅन्डवाल्या मंडळींची अनेक दुकाने आहेत. साधारणत: २५ जणांची दुकाने तर याच भागातील. हा तसा गजबजलेला भाग असतो. सगळा बाजार या भागात भरतो. कपडे, भांडे अगदी सोन्याची दुकानेही याच भागात आहेत.

विवाह मुहूर्त ठरल्यावर या भागात येणारा माणूस बॅन्डची सुपारी देऊन जात असे. एका बॅन्ड पथकात किमान दहा जण तरी असताच. प्रतिमाह सहा हजार रुपयांपर्यंत त्यांना मिळत. ज्याचा जेवढा बडेजाव अधिक तेवढे बॅन्डमधील व्यक्तींची संख्या वाढते; पण गेल्या काही दिवसांपासून विवाह सोहळ्यावर प्रशासनाने बंदी आणली.

अगदी निवड व्यक्तींच्या साक्षीने होणाऱ्या विवाह सोहळ्यात कोण बॅन्ड लावणार, असा प्रश्न शिवम् ब्रास बॅन्डचे प्रमुख राजू लव्हेरा यांनी विचारला.

आम्हाला संगीत फारसे कळत नाही, असे कोणी म्हणणार नाही. अगदी गायकाचा तानासह संगीतकारांनी बांधलेली धून जशास तशी उतरावी म्हणून आम्हाला रियाज करावा लागतो. पूर्वी लग्नसराई झाली की हे काम आम्ही करायचो, कारण तेवढी पुंजी जमत असे.

मात्र, करोनामुळे सारे बिघडले. कोणी बॅन्ड वाजविण्याची सुपारी देत नाही. गणपतीच्या पहिल्या किंवा विसर्जन मिरवणुकीमध्येही कधी कधी काम मिळायचे; पण आता सारे ठप्प आहे. ज्यांच्या घरी दुसरे काही कमावणे साधन आहे त्यांनी त्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे; पण ज्यांनी केवळ एवढेच काम केले होते अशा कलाकार माणसाला आता मजूर म्हणून वाट्टेल ते काम करावे लागत आहे. राजू बॅन्डचे लव्हेरा सांगत होते, काम मिळावे म्हणून लाचारी पदरी आली आहे. जमेल ते काम करायचे आणि प्रपंच पुढे ओढायचा एवढेच आपल्या हाती आहे, असेही ते सांगतात.

सारे काही ठप्प..

याच व्यवसायात अनेक वर्षे काढणारे अरविंद नेमाडे म्हणाले, आता कामच नाही. आता जगणे उधारी- उसनवारी सुरू आहे. सारे काही ठप्प आहे. औरंगाबाद शहरात ४० बॅन्ड पथके आहेत. या प्रत्येक पथकात २० जण असतात. शहरात किमान ८०० जण तर या व्यवसायावर पोट भरत. आता ही सारी मंडळी मिळेल ते काम करू लागली आहेत; पण तेही पुरेसे नाही. बांधकाम व्यवसायात मजूर म्हणून किंवा रंगकाम करण्यात काही जण गेले आहेत; पण ज्यांची मुले लहान आहेत त्यांची हैराणी झाली. अजूनही ती सुरूच आहे. शहरात तरी आठवडय़ातून एखाददुसरा दिवस काम मिळते; पण ग्रामीण भागात बॅन्ड वाजविणाऱ्या व्यक्तींची अवस्था अधिकच बिकट असल्याचे नेमाडे सांगातात. मंगलसमयी मुहूर्तावर वाजंत्री बहुगलबला करणारी मंडळी या दिवसांमध्ये नवी गाणी बसविण्यासाठी सराव करतात. नव्या गाण्यावर ताल धरता आला की वरातीत ठरलेल्या बिदागीपेक्षा अधिक रक्कम मिळायची; पण आता हे सारे थांबले आहे. आता दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नापर्यंत कोणतेही काम मिळणार नसल्याने ही मंडळी हैराण आहेत.