|| बिपीन देशपांडे

औरंगाबाद : बासमती तांदळाच्या दरांत किलोमागे १० ते ३० रुपयांपर्यंतची घट झालेली आहे. मागील कांही दिवसांपासून ही घसरण होत आहे. इराणमध्ये होणारी निर्यात मंदावली असून बासमती तांदूळ ज्याच्यापासून तयार होतो त्या धान (पॅडी) चे दरही क्विंटलमागे एक ते दीड हजार रुपये कमी झाल्याचा परिणाम बासमतीच्या दरावर झाला आहे.

चिन्नोर तांदूळ क्विंटलमागे एक हजार रुपयांनी दरात घसरला आहे. तर कोलम तांदळाचा दर एका गोणीमागे ५०० रुपयांनी कमी झालेला आहे. १५०९ हा नवीन प्रकारचा बासमती तांदूळ अलिकडे बाजारात आलेला असून त्याचा दर किलोमागे ६० ते ६५ रुपये किलोने आहे. ११२१ जातीचा बासमती ७५ रुपये किलो तर १४०१ प्रकाराचा तांदूळ सध्या ६५ रुपये किलोने मिळत आहे. पूर्वी हेच तांदूळ ९० ते १२० रुपये किलोपर्यंत असायचे.

बासमती तांदळाची प्रामुख्याने इराणमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. मात्र मागील काही महिन्यांपासून भारतातून होणारी निर्यात मंदावली आहे. शिवाय भारतात उत्पादनही वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्य़ांपेक्षा अधिकने उत्पादनात वाढ झालेली आहे. तर धानच्या (पॅडी) दरातही घसरण झालेली आहे. निर्यातीत घट झाल्यामुळे धानचा दरही खाली आला आहे. धानचे दर क्विंटलमागे ३३०० ते ३८०० रुपये होते. ते आता २२०० ते २८०० पर्यंत आलेले आहेत, असे येथील नव्या मोंढय़ातील ठोक किराणा मालाचे व्यापारी डॉ. सुभाऊ देवरा यांनी सांगितले. आंबेमोहोर तांदळाच्या दरात मात्र किलोमागे १० रुपयांनी वाढ झाल्याचे देवरा यांनी सांगितले.

करोनाशी संबंध नाही

आज जगभरात करोना विषाणूच्या आजाराने थैमान घातले आहे. त्याचा बाजारपेठेतील अनेक वस्तुंवर परिणाम होत आहे. मात्र, बासमतीचा दर कमी होण्याशी करोनाचा काहीही संबंध नाही. इराणमधील निर्यात सहा महिन्यांपासून मंदावली आहे आणि भारतातील उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे बासमतीच्या दरात घसरण होण्यामागे करोनाशी संबंध लावता येणार नाही, असे डॉ. सुभाऊ देवरा यांनी सांगितले.