आपल्यावर हल्ला होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस संरक्षण मागूनही आरटीआय कार्यकत्रे मोतीराम काळे यांना चार हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काळे दांपत्य व अन्य एकजण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
नांदेडपासून १५ किलोमीटर अंतरावरील जानापुरी येथे काळे यांचे वास्तव्य आहे. भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणारे काळे १०-१२ वर्षांपासून आरटीआय कार्यकत्रे म्हणून परिचित आहेत. कोणतीही भीड न ठेवता जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना, पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पाठपुरावा करून त्यांनी उघडकीस आणली. महावितरणमधील अनियमितताही आरटीआयच्या माध्यमातून निदर्शनास आणली. कोणत्याही दबावाला बळी न पडता हे कार्य करणाऱ्या काळे यांना गेल्या काही दिवसांपासून गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी देत होते.
वास्तविक, ज्या प्रकरणात काळे यांचा तीळमात्र संबंध नव्हता, अशा प्रकरणात तू आमच्याविरुद्ध माहिती अधिकारात माहिती मागतो काय, अशी विचारणा करून राजू येवले, प्रकाश कदम, शंकर येवले व नांदेडात राहणारा भुसेवार या चौघांनी रात्री त्यांच्या घरावर हल्ला चढवला. हल्ल्यात स्वत: काळे, त्यांची पत्नी नंदाबाई व बाबुराव नरोजी कदम हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री हा प्रकार कोणालाच समजला नाही. मंगळवारी दुपारी या प्रकरणी काळे यांनी सोनखेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. विशेष म्हणजे आपल्यावर हल्ला होणार आहे, हे काळे यांनी सोमवारी दुपारी सोनखेड पोलिसांना कळवले होते. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले ही बाब आता समोर आली आहे.
काळे यांनी सांगितले की, हल्ल्याची कुणकुण मला लागली होती. गेल्या १५ वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक दबाव मी झुगारले. अशा प्रकारच्या हल्ल्याने माझी अन्यायाविरोधातील लढाई थांबणार नाही. माझ्यासह माझ्या पत्नीला व भांडण सोडवण्यास आलेल्या बाबुराव कदम यांना हल्लेखोरांनी लाठय़ा-काठय़ांनी मारहाण केली. ते दोघेही शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे ज्या माहिती अधिकाराच्या संशयावरुन माझ्यावर हल्ला केला, त्या प्रकरणातील कोणतीही माहिती मी मागितली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.