क्रांतीदिनी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मुंबतील मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही रंगीत तालीम असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. मराठा मूक मोर्चाप्रमाणे वाहन रॅलीतही महिला आघाडीवर होत्या.
मराठा क्रांती मोर्चाच्या वाहन रॅलीला छत्रपती महाविद्यालयापासून सुरुवात झाली. गजानन मंदिर, क्रांती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे कॅनॉट परिसरात रॅलीचा शेवट करण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने महिला युवती आणि युवक या रॅलीत सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा जय घोषाने शहराचे मुख्य रस्ते दणाणून गेले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला मूक मोर्चा औरंगाबादमधून काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात विविध शहरात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. मात्र कोणतेही ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.