सुहास सरदेशमुख

देशी व विदेशी मद्यनिर्मितीमधून मार्च महिन्यापर्यंत राज्याच्या महसुलामध्ये मार्चपर्यंत चार हजार ६१५ कोटी रुपयांची भर  टाकणाऱ्या औरंगाबाद शहरातील कंपन्यांनी आता उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. या वर्षी पाच हजार ७५ कोटी रुपये मद्यनिर्मितीतून करापोटी मिळतील असे अपेक्षित होते. मात्र, टाळेबंदीतील फटका ३५० कोटी रुपयांचा आहे. असे असले तरी सामाजिक अंतर पाळून पुन्हा मद्यनिर्मितीस सुरुवात करण्यात आली आहे. बऱ्याच अडचणी असल्या तरी महसूल देणाऱ्या या मद्यनिर्मिती कंपन्यांकडून मुभा मिळाल्यानंतर नऊ कोटी १४ लाख ३८ हजार रुपयांचा महसूल राज्य सरकारकडे जमा करण्यात आला आहे. आता मद्यनिर्मिती आणि वितरणातील अडचणींमध्ये मोठय़ा प्रमाणात अडथळे आहेत. अनेक जिल्ह्यात मद्यवितरण नसल्याने सारे काही अडले आहे. मात्र, मद्यनिर्मितीस सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद  शहरात देशी आणि बिअर उत्पादन करणाऱ्या ११ कंपन्या आहेत. यामध्ये युनायटेड स्पीरिट, रॅडिको, ग्रानिओच, काल्सबर्ग लिलासन्स, एबी ब्रेव्हरीज या विदेशी व बिअर उत्पादक कंपन्यांनी ६ मे पासून उत्पादनास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांत उत्पादित केलेल्या विदेशी मद्यापोटी ४४ कोटी ७७ लाख ७९ हजार रुपयांचा महसूल मिळेल, अशी गणिते घालण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत उत्पादनावर आलेल्या मर्यादांमुळे गणित बिघडते की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. टाळेबंदीमध्ये ऑनलाइन मद्य विक्रीस काही जिल्ह्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे सारे जोपर्यंत सार्वत्रिक होत नाही, तोपर्यंत आर्थिक घडी नीट बसणार नाही. दरम्यान, या कंपन्यांमध्ये काम करण्यावर आता बंधने आली आहेत. सरासरी पाचशे ते ६५० मजूर काम करत. कंपनी व्यवस्थापनाला केवळ दहा ते १५ टक्केच कामगारांवर काम करण्याची मुभा आहे. गेल्या चार दिवसांपासून औरंगाबाद शहरात सर्व व्यवहार बंद आहेत. येत्या काळात मुभा मिळाली तर उत्पादन वाढू शकते. गेल्यावर्षी एप्रिल व मे महिन्यातील  महसूल हा ३५० कोटी रुपये होता. या वर्षी तेवढे नुकसान झाले आहे.

आता मद्यनिर्मितीस सुरुवात झाली आहे. मात्र, विक्री होत नाही. तसेच मद्यनिर्मिती कारखान्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवून काम केले जात आहे. आतापर्यंत देण्यात येणारा सरासरी ३९५ कोटी रुपयांचा महसूल आता नऊ कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. या वर्षी साधारणत: पाच हजार ७५ कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे अभिप्रेत होते. करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, बहुतांश कंपन्यांनी आता उत्पादनास सुरुवात केली आहे.

– सुधाकर कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद