देशभरात देण्यात येणारी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा फक्त बोलण्यापुरती राहिली असून महिला सक्षमीकरणासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद खालावली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुलींच्या घटलेल्या जन्मदराबाबतही चिंता व्यक्त केली.

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून औरंगाबादमध्ये स्त्री जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अगोदर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. युपीए सरकारच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी बजेटमध्ये खास तरतूद करण्यात येत होती. ३ टक्क्यांपासून वाढ करत ती ६ टक्क्यापर्यंत गेली होती. त्यामध्ये वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात त्यामध्ये घट झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी मुलींच्या घटलेल्या जन्मदराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादीकडून महिलादिनानिमित्त चिंतन शिबीर घेण्यात आले. यावेळी ‘बेटी बचेगी दुनिया चलेगी’ आणि ‘संविधान बचाव’ हे ठराव मांडण्यात आले.

हुंडा, स्त्री-भ्रूण हत्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे मुलींच्या जन्म दरात घट होत असल्याचे निरीक्षण यावेळी फौजिया खान यांनी नोंदवले. मुलगा घराचा चिराग आणि मुलगी इज्जत समजली जाते. त्यातून मुलींना वेगळी वागणूक दिली जात असल्याचे मतही त्यांनी मांडले. महिला प्रश्नावर त्यासाठी जागृती होणे गरजेचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. मुलींचा जन्मदर घसरला असून तो २०३१ पर्यंत पूर्वपदावर येईल असे अहवालात म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे. किमान दहा टक्क्यापर्यंत ही तरतूद व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी भवन येथे तरुणींनी रांगोळीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडले. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवली. मात्र, त्यासंदर्भात कोणताही प्रतिसाद आला नसल्याचेही यावेळी फौजिया खान यांनी सांगितले.