16 December 2017

News Flash

दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंचे नामदेव शास्त्रींना भावनिक पत्र

मी कोणासमोर कधी झुकले नाही

औरंगाबाद | Updated: September 27, 2017 6:10 PM

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर होणार की नाही? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर कोणत्याही राजकीय पक्षाचे भाषण नको, अशी भूमिका घेतली. त्यानंतर महंत यांची भूमिका आणि भाविकांची इच्छा यामध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आता त्यांनी एक भावनिक पत्र लिहून भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी द्या, अशी विनंती केली आहे.

मागील वर्षी दसरा मेळाव्यात नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलाच वाद झाला होता. याचा संदर्भ त्यांच्या विनंती पत्रात केला आहे. आपल्यात काय झाल या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पहिली आणि शेवटची विनंती करते आहे, असे त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलंय.

याशिवाय मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळत राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. समाज बांधण जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. भक्तांना त्रास होऊ नये. कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये. त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on September 27, 2017 6:10 pm

Web Title: bhagwangad dasara melava pankaja munde written a letter to namdev shastri