माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालय प्रांगणात मारहाण केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या संस्थेचे सदस्य शिवाजी भोसले यांना लातूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली.
दरम्यान, मारहाण प्रकरणी अभय साळुंकेंसह शिवसनिकांची सेनेतून हकालपट्टी केल्याचा आदेश युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मारहाणीत सेनेचा कोणताही संबंध नाही. ही घटना अतिशय िनदनीय आहे. शिवसेना याचे समर्थन करीत नसल्याचे सांगत साळुंके यांची हकालपट्टी केल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी स्पष्ट केले. साळुंके यांचे प्राथमिक सदस्यत्व स्थगित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अहवाल दिला जाईल. तेच या प्रकरणी निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, अॅड. बळवंत जाधव, अॅड. नागेश माने, नगरसेविका सुनीता चाळक उपस्थित होते.
भाईकट्टी यांच्या तक्रारीवरून भोसले व इतर २५ जणांविरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शाहू महाविद्यालयात कारकून काम करणारे शिवाजी भोसले हे महाविद्यालयाचा बांधकाम विभाग पाहतात. मारहाण सुरू असताना ते प्रांगणात होते. भाईकट्टी यांनी केवळ भोसले यांना ओळखतो, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रथम भोसले यांना अटक केली. इतर २५ जण फरारी आहेत.
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मारहाणीशी संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचा दावा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला. या प्रकरणाचा संस्थेशी वा महाविद्यालयाच्या कोणत्याही घटकाशी काही संबंध नाही. प्राचार्य डॉ. एस. डी. साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
मेंदूचा शोध घ्यावा- निडवदे
जिल्हय़ास काळीमा फासणारा हा प्रकार आहे. या मागील मेंदूचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी केली. महाविद्यालयात मारहाण करणे हा कोणता पॅटर्न, ही कोणती संस्कृती याची सखोल चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला. एक महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षकांना भाईकट्टी यांनी पोलीस संरक्षण द्यावे या साठी दूरध्वनी केला होता. भाईकट्टी यांनीही दोनदा निवेदन दिले. तरीही संरक्षण दिले नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलीस व मारहाण करणारे यांचे लागेबांधे असल्याचा आरोपही लाहोटी यांनी केला.
विद्रोही ग्रुप, अभाविपतर्फे निषेध
भाईकट्टी यांना मारहाणीच्या निषेधार्थ विद्रोही ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ग्रुपचे अध्यक्ष अतिष चिकटे यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लातूरच्या शैक्षणिक लौकिकास काळीमा फासणारा हा प्रकार असून अभाविप याचा तीव्र निषेध करते, असे स्थानिक शाखेने पत्रकात म्हटले आहे.
शाहू महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त व सुसंस्कृत संकुल म्हणून ओळखले जाते. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांलाही प्रवेश करायचा असेल तर ओळखपत्र बंधनकारक आहे; परंतु महाविद्यालयात अज्ञात व्यक्ती तासभर मारहाण करतात. महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. ही बाब महाविद्यालयाच्या शिस्तीत बसते का, असा प्रश्नही करीत अभाविप शिष्टमंडळाने प्राचार्याना निवेदन दिले. विद्यापीठ विभाग संघटनमंत्री अभिजित पाटील, लातूर महामंत्री सिद्धेश्वर लटपटे, स्वप्नील गंगणे, योगेश शेळके आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
भाईकट्टींमुळे ७२ प्रकरणे धसाला
भाईकट्टी यांनी गेल्या काही महिन्यात लातूर शहरातील ७८ प्रकरणात लक्ष घातले. तब्बल ७२ प्रकरणी तपास सुरू झाला. शहरातील िरगरोड परिसरात रस्ता दुभाजकातील बगीचा, मनपातील टँकर घोटाळा, लातूर औद्योगिक वसाहतीतील नियमबाहय़ कारभार, एमआयडीसी परिसरात उद्योजकांतील अनियमितता अशी यातील काही ठळक उदाहरणे. आठ अधिकाऱ्यांचे निलंबन भाईकट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे होऊ शकले. भाईकट्टी स्वत: भाडय़ाच्या घरात राहतात. त्यांच्या हेतूवर अनेकजण तोंडी शंका घेत असले, तरी पुराव्यासह तक्रार करण्याचे एकानेही धाडस दाखवले नाही. आतापर्यंत त्यांना मारहाणीची एकही घटना घडली नाही. मात्र, शाहू महाविद्यालयाचे प्रकरण बाहेर निघताच दुसऱ्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांच्या साक्षीने त्यांना मारहाण करण्यात आली.