माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे अभय साळुंके यांच्यासह अन्य २५ जणांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मंगळवारी फेटाळला.
शाई व मारहाण प्रकरणानंतर या सर्वावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, सर्व आरोपी फरारी झाले. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. भाईकट्टी मारहाण प्रकरणात शाहू महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व संस्थेचे सदस्य शिवाजी भोसले यांना अटक केली होती. साळुंके व अन्य दहा जणांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. १३ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. न्या. श्रीमती आय. के. जैन यांनी हा जामीन अर्ज फेटाळला. साळुंके यांच्या वतीने अॅड. सुदर्शन साळुंके यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने गणाचार्य यांनी बाजू मांडली. मारहाण प्रकरणास महिना उलटून गेल्यानंतरही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याबद्दल भाईकट्टी यांनी मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली आहे.