नगरपालिका निवडणूक

नगरपालिकांच्या निवडणुकीत मराठवाडय़ात भाजप मागच्या बाकावर दिसून येत आहे. २९ नगरपालिकांच्या निकालामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ९ पालिकांमध्ये विजय मिळाला. शिवसेनेला पाच नगरपालिकांवर ताबा मिळवता आला. मात्र, भाजपला केवळ चार पालिका ताब्यात ठेवण्यात यश आले. विशेष म्हणजे मराठवाडय़ातील रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. दिग्गज नेत्यांना त्यांच्या गावातील पालिकांवरही ताबा मिळविता आला नाही. तुलनेने नवखे समजले जाणारे नारायण कुचे यांनी त्यांच्या भावजय संगीता कुचे यांना निवडून आणले तसेच हिंगोलीतून बाबाराव बांगर यांनी विजय मिळविला. निकालानंतर भाजपला मागच्या रांगेत का बसावे लागले याची चर्चा सुरू झाली आहे. ‘कमळ’ चिन्ह नाकारल्याचा परिणाम असावा, असेही मानले जात आहे.

एमआयएमचा प्रभावही मराठवाडय़ात वाढत असल्याचे दिसून आले आहे. बीडमध्ये एमआयएमचे ९, माजलगावमध्ये १ व हिंगोलीमध्ये १ जागा मिळाल्याचा दावा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले. एमआयएमचा प्रभाव वाढल्यावर भाजपला यश मिळते, असा दावा केला जात असे. मात्र, या निवडणुकीत तोही फोल ठरल्याचेच दिसून आले. भाजपच्या मराठवाडय़ातील नेतृत्वामध्ये दोष असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. या निवडणुकीमुळे भाजप मागच्या बाकावर गेला आहे. जालना नगरपालिकेत भाजपने उमेदवार दिला नव्हता. चार नगरपालिकांपैकी अंबडच्या नगरपालिकेचे अध्यक्षपद भाजपकडे आले आहे. अन्य तीन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत. बीड, जालना या जिल्हय़ात शिवसेनेकडे एकही नगरपालिका नाही. परभणीमध्ये भाजप शून्य आहे, उस्मानाबादची अवस्थाही अशीच आहे. परभणी जिल्हय़ात भाजपचे केवळ ४ नगरसेवक निवडून आले आहेत. मराठवाडय़ात भाजपने रणनीती ठरविताना अन्य पक्षातील नेत्यांबरोबर ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ केल्याचाही आरोप केला जात होता. निकालानंतर त्यांची आठवण करून दिली जात आहे.