औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असतानाच, भाजपने डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन वेगळा संदेश दिला. ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) हा प्रयोग अधिक विस्तारण्याकरिता भाजपने डॉ. कराड यांना उमेदवारी देतानाच महत्त्वाकांक्षी नेत्या पंकजा मुंडे यांनाही सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत.

राज्यसभेवर शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खरे ‘आदित्य सेने’वर नाराज असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. ‘त्यांना आता नव्यांना संधी द्यायची आहे. मला राज्यसभेवर उमेदवारी मिळावी अशी मराठवाडय़ाची गरज होती. मात्र, आदित्यसाहेबांना नाही आवडले. आता ती बाई इंग्रजी खूप चांगले बोलेल,’ अशी तिरकस टिप्पणी खरे यांनी व्यक्त केली. पण काही झाले तरी मी शिवसेनेचे मरेपर्यंत काम करेन, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

वयाने लहान असले तरी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतल्याने पूर्वी वाद झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शासकीय बैठकींना कोणतेही पद नसताना खासदार खरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे वर्तणुकीमुळे नेहमीच वादात असणारे खासदार खरे यांचा शिवसेना राज्यसभेसाठी किती विचार करेल, याविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या.

या संदर्भात खैरे म्हणाले की जेव्हा दंगल झाली तेव्हा लढण्यासाठी आम्ही पुढे होतो, पण विचार केला गेला नाही. त्यामुळे नाराज आहे. आता या बाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर स्वत:हून जाणार नाही. मात्र, मरेपर्यंत शिवसेनेचेच काम करू. निवडणुकीदरम्यान निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर देण्याबाबतही नाराजी व्यक्त केली. गरज नसताना असे निर्णय घेतल्याचे सांगत काही जणांनी जाणीवपूर्वक पराभव व्हावा म्हणून काम केले, असा आरोप केला. उमेदवारी मिळाली असती तर महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना सोपे गेले असते, असे सांगत खासदार खरे यांनी ‘आदित्य सेने’वर नाराज असल्याचे सांगितले.

डॉ. कराड यांना राज्यसभेची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना भाजपने उमेदवारी देत ‘माधवं’ सूत्रातील वंजारी घटक अधिक महत्त्वाचा असल्याचा संदेश दिला आहे. गेल्या काही दिवसापासून माधवं सूत्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात होता. पंकजा मुंडे यांनी पाणीप्रश्नी केलेले आंदोलन हा एका नाराजी सूत्राचा भाग होता. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने होणारे आंदोलन नंतर भाजपच्या व्यासपीठावरून करण्यात आले. या काळात ‘माधवं’ सूत्राकडे भाजप दुर्लक्ष करीत असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर जोरदारपणे फिरविण्यात आले होते. डॉ. कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात. पण त्यांनी नंतर भाजपच्या प्रत्येक नेतृत्वाबरोबर जुळवून घेत प्रदेश पातळीवर दिलेले जबाबदारी पार पाडली. त्यामुळे डॉ. कराड यांना उमेदवारी मिळाल्याचा औरंगाबाद भाजप कार्यकर्त्यांत आनंद निर्माण झाला आहे. भाजपाचा पाया विस्तारण्याकरिता मराठवाडय़ातील इतर मागासवर्गीय समाजातील नेत्याला संधी देण्याची योजना होती. यानुसार माजी उपमहापौर डॉ. कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

एखादा विषय सतत बोलणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवडत नसल्याने राज्यसभेची उमदेवारी मिळावी, असा विषय त्यांच्याकडे एकदाच काढला होता. तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांच्याशी या विषयावर शिवसेनेतील नेत्यांनीही चर्चा केली होती. मात्र, प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते.

-चंद्रकांत खैरे, नेते, शिवसेना