दानवे, पंकजा मुंडे, लोणीकर यांना धक्का; राज्यात पीछेहाट होत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलासा

राज्यात भाजपला अन्यत्र यश मिळाले असले तरी मराठवाडय़ात मात्र पक्षाची पीछेहाट झाली आहे. अगदी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर या पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीला अन्यत्र संमिश्र यश मिळाले असले तरी मराठवाडय़ात चांगली बाजी मारली आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजाचा दारुण पराभव करीत स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केले.

निवडणुका लढविताना व्यूहरचना आखताना केलेल्या चुकांमुळे भाजपला मोठय़ा अपयशाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बाजी मारल्याचे दिसून आले. परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांमध्ये भाजपला एकही नगराध्यक्षपद जिंकता आलेले नाही. विशेषत: प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा ऊहापोह भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाला आहे.

परभणी जिल्ह्य़ात सोनपेठ, गंगाखेड या पालिका काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. पूर्णा, मानवत या दोन नगपालिकांचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी उस्मानाबादची जागा मात्र शिवसेनेने राखली. येथून नंदू राजेनिंबाळकर निवडून आले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचा आतेभाऊ अमोल पाटोदकर यांना उमेदवारी दिली होती. मतदानाच्या फेऱ्यात बराच काळ पाटोदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. भूम, परंडा, तुळजापूर, कळंब व नळदुर्ग या पाच नगरपालिकांवर राष्ट्रवादीने कब्जा मिळविला आहे. मात्र, स्वत: लक्ष घालूनही पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादेत यश मिळू शकले नाही.

यश न मिळविता येणाऱ्या दिग्गजांच्या यादीत भाजपच्या नेत्यांची नावे अधिक आहेत. जालना नगरपालिकेत ऐन वेळी अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करून भाजपने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. भाजपने उमेदवार न दिल्याने काँग्रेसच्या संगीता कैलास गोरंटय़ाल निवडून आल्या. कैलास गोरंटय़ाल हे जालन्याचे माजी आमदार आहेत. अशीच अवस्था परतूरची झाली. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी लोणीकर यांना पक्षाचे चिन्ह न देता छताचा पंखा हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला लावली. त्यांचाही पराभव झाला. निवडणुकीपूर्वी त्यांच्या विरोधात एक कार्यकर्ता उपोषणालाच बसला होता. भाजपच्या मोठय़ा नेत्यांना पराभवाचा नारळ मिळाला असला तरी अंबड नगरपालिकेत आमदार नारायण कुचे यांची भावजय संगीता देवीदास कुचे विजयी झाल्या आहेत. या नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. राजेश टोपेंनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. मात्र, त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.

हिंगोली जिल्ह्य़ातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांमध्ये खासदार राजीव सातव यांच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढतील व नगरपालिकाही ताब्यात येतील, असा दावा केला जात होता; पण परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मराठवाडय़ातील चार जिल्ह्य़ांतील ३० नगरपालिकांचे निकाल लक्षात घेता काँग्रेसला फटका बसला आहे. भाजप स्पर्धेतच राहिला नाही. राष्ट्रवादीने मात्र मुसंडी मारल्याचे दिसते.

शिवसेनेच्या काही नेत्यांना मतदारांनी नाकारले. उमरग्यामध्ये खासदार रवि गायकवाड आणि आमदार ज्ञानेश्वर चौगुले शिवसेनेची खिंड लढवण्यासाठी सज्ज होते. मात्र, येथे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी केलेला प्रचार आणि केलेली व्यूहरचना कामी आल्याचे दिसून येते. परभणी जिल्ह्य़ात पूर्णा आणि मानवत या दोन नगरपालिका वगळता सेनेला यश मिळाले नाही. सर्व नगरपालिकांमध्ये एमआयएमच्या उमेदवारांनीही लक्षणीय मते घेतली. बीड, उस्मानाबाद, नळदुर्ग या पालिकांमध्ये एमआयएमच्या घेतलेली मते निकालावर परिणाम करणारी होती.

  • परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी घेतलेली मेहनत आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या गावातून निघालेला सूर त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
  • पंकजा मुंडे यांच्या राजकीय वर्तनाविषयीच्या चर्चा आणि परळीतील जनता यावरही प्रकाश टाकला जात आहे. ‘ओबीसी’च्या नेत्या म्हणून स्वत:ची प्रतिमा विकसित व्हावी, असे प्रयत्न त्यांच्याकडून पद्धतशीरपणे सुरू होते.
  • छगन भुजबळांची त्यांनी घेतलेली भेट, ओबीसी एकत्रीकरणासाठी काढलेल्या मोर्चामागे त्यांचा हात अशा अनेक मुद्दय़ांकडे लक्ष वेधले जात आहे. परळी हा लिंगायतबहुल मतदारसंघ असल्याने शहरातून राष्ट्रवादी पक्षाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे नवी समीकरणे मांडली जात आहेत.

मराठा कार्ड यशस्वी

कोपर्डी दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर राज्यात मराठा समाज संघटित झाला. त्याची सुरुवात औरंगाबादमधून झाली. मराठवाडय़ात मोठाले मोर्चे निघाले. मराठवाडय़ातील मतदारांनी भाजपला नाकारून राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याने मराठा आरक्षण किंवा अन्य मुद्दे जास्त प्रभावी ठरल्याची चर्चा आहे.