निधी न देताच भाजपकडून योजनांचा प्रचार

घोषणा झाली की, काम पूर्ण झाले आहे असे मानून राज्य सरकारने नवनिर्वाचित सरपंचांना दिलेल्या पुस्तिकेमध्ये सुरू न झालेल्या अनेक योजनांची माहिती घुसवली आहे. औरंगाबाद शहराच्या विमानतळासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली. शासन निर्णयही काढण्यात आला मात्र या कामासाठी वारंवार मागणी करून निधी मिळालेला नाही. केवळ सव्वादोन कोटी रुपयांच्या निधीतून प्राथमिक स्वरूपाचे काम बैठकांच्या स्तरावर सुरू आहे. अशीच बाब जालना सीडपार्कची आहे. यासाठी १०९ कोटी रुपयांची गंतवणूक झाल्याचे पुस्तिकेमध्ये नमूद आहे. वास्तविक सीडपार्कसाठी काही एक झाले नसल्याचे जालना येथील बियाणे क्षेत्रातील व्यक्ती सांगतात.

काम पूर्ण होण्याआधी ते कसे पूर्ण आहे आणि त्याने परिवर्तन होत असल्याचा दावा करणारी एक पुस्तिका राज्य सरकारने भाजपच्या सरपंचांना दिली आहे. विविध योजनांच्या घडीपत्रिका आणि राज्य सरकारने केलेली कामे याचा तपशील त्यांनी गावोगाव पोहचवावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी ४८०० कोटी रुपयांचा निधी राज्यपालांच्या सूत्राबाहेर देण्यात यावा, अशी विनंती केली असल्याची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. वास्तविक अशा प्रकारची मागणी आघाडी सरकारच्या काळातच करण्यात आली होती. ही रक्कम उभी करण्यासाठी राज्य सरकारने रोखे काढण्याचीही विनंती केली होती. त्याला पूर्वी मंजुरी मिळाली नव्हती. आता ही मंजुरी मिळाली आहे की नाही, याबाबतचा तपशील समजू शकला नाही. जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी मात्र अशी रक्कम देण्यास राज्यपाल सकारात्मक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात अशी कारवाई झालेली नसल्याचे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात.

प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला. मात्र, असे करताना पहिल्या हप्त्याची ४३ कोटी रुपयांची रक्कम अजून मिळालेली नाही. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्याआधी श्रेयासाठीची तयारी मात्र जोरात सुरू आहे. करावयाच्या कामांची मोठी यादी या पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची ‘वाटचाल अविरत ध्येयाकडे’ असे पुस्तिकेचे नाव आहे. पुस्तिकेतील माहिती भाजप सरपंचांनी जोरदारपणे सांगावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच केले.