पदवीधर निवडणुकीच्या पराभवाबाबत भाजप नेते बावनकुळे यांची कबुली
औरंगाबाद: भाजपने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला तरी त्या निर्णयाचा भाजपला पाठिंबा वाढण्यासाठी उपयोग झाला नाही. उलट आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशीच भावना मराठा समाजात आहे. त्याचा काहीसा फटका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बसला असल्याचे भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबूल केले.
पदवीधर मतदारसंघातील पराभवाची मीमांसा करण्यासाठी ते गेले दहा दिवस मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जालना आणि औरंगाबादमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत चर्चा केली. नोंदणी करताना झालेल्या चुका, ऐनवेळी उमेदवारी घोषणा त्यातून निर्माण झालेले नाराजी नाटय़, याचबरोबर उमेदवाराच्या निवडीमध्ये झालेल्या चुकांमुळेही पराभवाचा सामना करावा लागला असल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोहचले असून पुढील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया दोन वर्षे आधीपासून केली जावी, अशी शिफारस करू, असे बावनकुळे म्हणाले.
ज्या मतदारसंघात भाजप शक्ती कमी होती अशा मतदारसंघात राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात आले. त्यामुळे भाजपची प्रतिमा मराठा केंद्रित पक्ष अशी बनत गेली, त्याची प्रतिक्रिया ओबीसी समाजात उमटली आणि त्याचाही परिणाम निवडणुकीतील पराभवापर्यंत गेला असेल असे वाटत नाही. पण ही प्रतिमा निर्माण झाली असल्याचे मान्य करत बावनकुळे यांनी पदवीधर निवडणुकीच्या हद्दीपर्यंत ‘सोशल इंजिनिअरींग’ मध्ये काही चुका झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचविल्याचे सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सतीश चव्हाण यांचा विजय हा राष्ट्रवादीचा नाही, तर उमेदवाराच्या संपर्काचा भाग असल्याचे निरीक्षण समोर येत असल्याचे सांगितले. नव्या आघाडीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी शिवसेनेकडून अधिक काम झाल्याचीही निरीक्षणे कार्यकर्त्यांनी सांगितली आहेत. पण जुनी मतदार यादी रद्द झाल्याने तसेच सरकारी नोकरांची नोंदणी करून घेण्यात भाजप तुलनेने कमी पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील निवडणुकीमध्ये ऐन वेळी उमेदवार न ठरविता दोन वर्षे आधी उमेदवार ठरवावा अशी शिफारस असेल, असे बावनकुळे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2020 3:02 am