जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मावेजा रकमेवर वकिलानेच डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे हे विधिज्ञ भाजपचेही पदाधिकारीही आहेत. मावेजातील कोटय़वधी रुपये स्वत:च्या नावावर जमा करून घेत मावेजातील रकमेचा अपहार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासह केंद्रीय सतर्कता आयोगाकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश बजावले आहेत.

उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील साठवण तलावासाठी एकुरगा, दगड धानोरा, वागदरी, व्हंताळा, भोसगा, बलसूर या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले. त्यातील बरीच प्रकरणे अ‍ॅड. व्यंकट गुंड यांच्यामार्फत महसूल प्रशासनामार्फत सुनावणीसाठी सुरू होती. निकाल लागल्यानंतर अ‍ॅड. गुंड यांनी मोबदल्यापोटी मिळणारी मावेजाची रक्कम शासन निर्देशानुसार राष्ट्रीयीकृत बँकेत जमा न करता स्वत: संचालक असलेल्या मल्टीस्टेट बँकेच्या उमरगा शाखेत जमा केली. अनेकांची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर देखील त्यांना अद्याप माहिती अथवा रक्कमही देण्यात आलेली नाही. न्यायालयीन कामकाजाचा शुल्कापोटी शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या मावेजा रकमेच्या निम्म्यापेक्षा अधिक रक्कम अ‍ॅड. गुंड यांनी बळजोरीने घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे दाखल केली.

मोहन अप्पय्या स्वामी यांच्या देव वडगाव येथील साडेपाच एकर जमिनीचे १९९९ मध्ये भूसंपादन झाले आहे. त्याचा निकाल २००४ साली लागला आहे. रक्कम मंजूर होऊन धनादेश देखील आला आहे, असे वकील गुंड सांगतात. मात्र, मोहन स्वामी
यांना अद्याप एक रुपयाही मावेजाची रक्कम मिळालेली नाही. नाईचाकूर येथील मल्लिकार्जुन लकडे यांची साडेसात एकर जमीन तलावात गेली आहे. त्यातील तीन एकर शेतीचे प्रकरण गुंड यांच्याकडे होते. त्यांनी गुंड यांच्या रूपामाता मल्टीस्टेटमधून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम व्याजासहित वजा करून बाकी रक्कम दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. पशाची वाट पाहत मल्लिकार्जुन यांचे निधन झाले. आठ वर्षे उलटूनही त्यांचा मुलगा माधव लकडे यांना एक रुपया देखील अद्याप मिळालेला नाही.

एकुरगा येथील जयसिंग दर्याप्पा काटगावे यांच्याकडून तर चक्क ५० लाखांहून अधिक रक्कम वसूल केली आहे. काटगावे यांना एक कोटी २० लाख ९५ हजार १९३ रुपये मावेजा मंजूर झाला होता. करापोटी सात लाख ८६ हजार रुपयांची कपात
करून उर्वरित एक कोटी १३ लाख आठ हजार रुपयांचा धनादेश हैदराबाद बँकेत वटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र अ‍ॅड. गुंड यांनी तसे न करता स्वतच्या रूपामाता मल्टीस्टेटमध्ये काटगावे यांचे परस्पर खाते उघडले आणि त्यांचा धनादेश जमा करवून घेतला. जमा केलेल्या रकमेपकी केवळ ६० लाख ९६ हजार रुपये काटगावे यांना दिले गेले. बाकी रक्कम फी आणि उर्वरित खर्चापोटी गुंड यांनी वसूल करून घेतली. काटगावे यांच्या बहिणीच्या नावे जमा केलेली रक्कम देखील अद्याप दिली नसल्याचे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

मुरुम येथील सामाजिक कार्यकत्रे रामिलग पुराणे यांनी एकुरगा गावातील लुबाडणूक झालेल्या ३८ शेतकऱ्यांची माहिती माहितीच्या अधिकारात गोळा केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पुराणे यांनी राज्याच्या सहकार विभागासह, महाराष्ट्र आणि गोवा विधिज्ञ मंडळ आणि केंद्रीय सतर्कता आयोगाकडे या भाजप पदाधिकाऱ्याने केलेल्या कारनाम्यांची तक्रार दाखल केली होती. याबाबत अ‍ॅड. व्यंकट गुंड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. तसेच लघुसंदेशाला देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

चौकशी समिती नेमली आहे – जिल्हाधिकारी मुधोळ-मुंढे
शेतकऱ्यांची लुबाडणूक करून कोटय़वधी रुपयांचा गरव्यवहार झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक यांना प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.