मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर पंकजा मुंडे उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर पंकजा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘मराठवाड्याच्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे उपोषण सत्तेच्या विरोधात नाही, तर सरकरचं लक्ष वेधण्यासाठी आहे,” असं त्या म्हणाल्या.

गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. सोमवारी, २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर सकाळी त्यांनी उपोषण सुरू केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठवाड्यातील स्थलांतरण, बेरोजगारी थांबायची असेल, तर पाणीप्रश्न सुटायला हवा. मराठवाड्याच्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारमध्ये असताना टँकरमुक्त मराठवाड्यासाठी काम केलं. आता या सरकारनं मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष द्यावं. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झाले आहेत. त्यामुळे टीका करण्याची ही वेळ नाही. टीका करणारही नाही. हे उपोषण सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

औरंगाबादेत सुरू असलेल्या या उपोषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महादेव जानकर यांच्यासह भाजपाचे आमदार सहभागी झाले आहेत.